जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
मुंबईतील समुद्र किनारपट्टीवर महापालिकेकडून सागरी किनारा रस्ता म्हणजेच कोस्टल रोड बनवला जात आहे. मुंबई महापालिकेत सत्ताधारी असलेल्या शिवसेनेचा कोस्टल रोड हा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. कोस्टल रोडच्या प्रकल्पासाठी 17 कंत्राटदार पात्र ठरले आहेत. यासाठी निविदा प्रक्रिया सहा महिन्यांपासून सुरू होती. कोस्टल रोड बांधण्याच्या निविदा पूर्वी एक पत्रकार परिषद घेण्यात आली होती. या परिषदेत पात्र ठरलेले कंत्राटदार सहभागी होते. या परिषदेत या कंत्राटदारांनी 774 शंका उपस्थित केल्या. मात्र, त्या सर्व शंकांचे निरसन करण्यात आले.
मुंबईच्या किनारपट्टीवर भराव टाकून, पूल आणि बोगद्यांचं बांधकाम करुन एकूण 35.6 कि.मी. लांबीच्या कोस्टल रोडची बांधणी केली जाणार आहे. या कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्यासाठी 5303.34 कोटींचा खर्च येणार आहे. कोस्टल रोडवर अॅम्बुलन्ससाठी स्वतंत्र मार्गिका असणार आहे. ही मार्गिका पावणे तीन मीटर रुंदीची असेल. कोस्टल रोडला जोडून सायकल ट्रॅक, सार्वजनिक उद्याने, जॉगिंग ट्रॅक तसेच, खुले प्रेक्षागृह आदींचा समावेश असेल. जानेवारी 2018 पासून प्रत्यक्ष कोस्टल रोडच्या कामाला सुरुवात होणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.