मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाला भेट दिली. या रुग्णालयात मागील २-३ दिवसांपासून मोठ्या संख्येने मृत्यू होत आहेत.
रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे मोठ्या संख्येन मृत्यू होत आहेत. ही गंभीर बाब आहे. प्रशासन काय करत आहे, असा जाब विरोधक विचारत आहेत. ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात १० ऑगस्टला उपचार सुरू असताना पाच रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. हे प्रकरण ताजे असतानाच, शनिवारी रात्रीपासून ते रविवारी सकाळपर्यंत १२ तासात रुग्णालयात आणखी १८ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यानंतर विरोधक आक्रमक झाले.
रुग्णांच्या प्रकृतीची विचारपूस
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाला भेट देऊन रुग्णांच्या प्रकृतीची विचारपूस केली. उपचारांची माहिती घेतली. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना, मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात घडलेल्या घटनेची संपूर्ण चौकशी करण्यासाठी शासनाने ९ सदस्यांची समिती स्थापन केल्याचे सांगितले. समिती २५ ऑगस्टपर्यंत अहवाल सादर करेल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. अहवालात दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
मोफत रुग्णवाहिका सेवा
छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय या दोन्ही ठिकाणांहून रुग्णांच्या सोयीसाठी मोफत रुग्णवाहिका सेवा तात्काळ सुरू करावी, अतिदक्षता विभागातील खाटांची संख्या वाढवावी, त्यासाठी आवश्यक वैद्यकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांची तात्काळ भरती करावी असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. रुग्णांच्या उपचारांसाठी तातडीने कार्यन्वित करण्याच्या अत्यावश्यक सेवांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.