नवी दिल्ली: हरियाणातील यमुनानगर येथील सिव्हिल सर्जन डॉ. मनजीत सिंह यांचा आज मृत्यू झाला. महिला डॉक्टरच्या लैंगिक शोषण आणि जातीवाचक शब्दप्रयोग प्रकरणात ते फरार होते. सतत ठिकाणे बदलत ते पोलिसांच्या अटकेपासून वाचण्याचाा प्रयत्न ते करत होते. पण, आज कुरूक्षेत्र येथील एका फार्महाऊसमध्ये त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला. पहाटे त्यांची प्रकृती बिघडली होती. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आला. त्यानंतर आता मृत्यूचे कारण समोर येईल.
हरियाणातील यमुनानगरमधील एका 25 वर्षीय महिला डॉक्टरने मनजीत सिंह यांच्यावर लैंगिक छळ आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप केला होता. पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत महिला डॉक्टरने म्हटले की, सीएमओ डॉ. सिंह अनेकदा मद्यधुंद अवस्थेत असायचे. त्यामुळे महिला डॉक्टरला ऑफिसमध्ये जाण्यास भीती वाटात होती. सीएमओ विनाकरण महिलेला ऑफिसमध्ये बोलावत असे. यामुळे महिला अस्वस्थ व्हायची.
महिलेने तक्रारीत म्हटले की, "20 सप्टेंबर रोजी सीएमओनं फोन केला होता. यावेळी त्यांनी शारीरिक संबंधाची मागणी केली. तसेच जातीबद्दलही अपमानास्पद टिप्पणी केली. 10 मिनिटात तयार हो, मला तुझ्यासोबत सेक्स करायचा आहे", असे ते म्हणाले. तुमच्यासारख्या लोकांना जॉब सहज मिळतात. तो टिकवण्यासाठी तुला यावंच लागेल, असेही सीएमओ म्हणाले, अशी माहिती पीडित डॉक्टरने दिली.
महिलेने गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपी फरार झाला. या प्रकरणाचा तपास पोलिसांनी केला. तसेच आरोपीचा शोध घेतला. सीएमओच्या कुटुंबाकडून पीडितेला तक्रार मागे घेण्यासाठी धमकावले जात होते. यासंदर्भातही महिलेने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. दरम्यान, यानंतर सिंह यांच्या मृत्यूचीच बातमी समोर आली. त्यांचा ह्रदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्याची माहिती समोर आली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.