चिमूरच्या घोडा यात्रेला उत्साहात प्रारंभ

चिमूरच्या घोडा यात्रेला उत्साहात प्रारंभ

विदर्भात प्रसिद्ध असलेली चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूरच्या घोडा यात्रेला सुरुवात झाली आहे. या यात्रेत जगन्नाथ पुरीप्रमाणे हाताने लाकडी रथ ओढण्याची प्रथा आहे. या यात्रेचं मुख्य आकर्षण म्हणजे श्रीहरी बालाजीची लाकडी घोड्याच्या रथावरुन काढण्यात येणारी भव्य मिरवणूक आहे. शुक्रवारी रात्री मोठ्या उत्साहात ही मिरवणूक यात्रा पार पडली. विशेष म्हणजे जगन्नाथ पुरीप्रमाणे इथेही हाताने लाकडी रथ ओढण्याची प्रथा आहे. मध्यरात्री झालेल्या विशेष पूजेनंतर बालाजीच्या उत्सवमूर्तीला लाकडी रथावर विराजमान करण्यात आलं आणि त्यानंतर तिची पहाटे पाच वाजेपर्यंत शहरातून मिरवणूक काढण्यात आली. ही यात्रा पाहण्यासाठी आणि हा रथ ओढण्यासाठी हजारो लोकांनी इथे एकच गर्दी केली होती.

साधारण साडेतीनशे वर्षांपूर्वी चिमूर गावातील भिकाजी पाटील डाहुले या स्थानिक व्यक्तीच्या घरी पायवा खोदला जात असताना त्यांना खोदकामात एक पुरातन बालाजी मूर्ती सापडली होती. मात्र या घोडा यात्रेला पेशव्यांच्या काळापासून खरी सुरुवात झाली. पेशवाईतल्या साडे तीन शहाण्यांपैकी एक असलेले देवाजीपंत चोरघडे यांनी या मंदिराची निर्मिती केली आणि तेव्हापासून वार्षिक उत्सव म्हणून या घोडा यात्रेची सुरुवात झाली.

या यात्रेसाठी चंद्रपूर जिल्ह्यासह विदर्भातील हजारो लोक चिमूरमध्ये दाखल होतात. तिरुपती बालाजीला बोललेला नवस इथे फेडता येत असल्याची लोकमान्यता असल्यामुळे सुद्धा या काळात चिमूरमध्ये लोकांची मोठी गर्दी होते. 1942 मध्ये इंग्रजांविरुद्ध झालेल्या चिमूर क्रांतीमध्ये सुद्धा या बालाजी मंदिराची भूमिका महत्त्वाची होती आणि त्यामुळे हे मंदिर आणि यात्रा इतक्या वर्षानंतरही लोकांमधलं आपलं स्थान अजूनही कायम ठेवून आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version