छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस दलातील भरती प्रक्रियेला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे. ग्रामीण पोलीस दलातील एकूण 53 पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू असून, यामध्ये 49 पोलीस कॉन्स्टेबल आणि 4 बँडसमन पदांचा समावेश आहे. या भरतीसाठी तब्बल साडेचार हजारांहून अधिक तरुणांनी अर्ज केल्याची माहिती ग्रामीण पोलीस अधीक्षक विनायकुमार राठोड यांनी दिली आहे. विशेष म्हणजे, या भरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर उच्चशिक्षित तरुण सहभागी झाल्याचे चित्र समोर आले आहे.
एकूण अर्जदारांपैकी 667 उमेदवार हे उच्चशिक्षित असून, त्यामध्ये अभियांत्रिकी, व्यवस्थापन, विज्ञान, वाणिज्य, फार्मसी आणि कायदा क्षेत्रातील पदवीधरांचा समावेश आहे. उपलब्ध माहितीनुसार 15 उमेदवार बीई, 12 बी.टेक, 14 एमबीए, 9 फार्मसी, 27 एमएससी, 2 एलएलबी, 263 बीएससी आणि 35 बीकॉम पदवीधर आहेत. विविध क्षेत्रांतून शिक्षण घेतलेले तरुण पोलीस भरतीकडे आकर्षित होत असल्याने सरकारी नोकरीकडे वाढता कल स्पष्टपणे दिसून येत आहे.
ग्रामीण भागातील तरुणांमध्ये पोलीस दलात सेवा करण्याची इच्छा आणि सामाजिक सुरक्षेसाठी योगदान देण्याची भावना मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे यावरून स्पष्ट होते. स्थिर नोकरी, सामाजिक प्रतिष्ठा आणि देशसेवेची संधी यामुळे तरुण पोलीस दलाकडे वळत असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. या भरती प्रक्रियेमुळे ग्रामीण भागातील तरुणांना एक महत्त्वाची संधी उपलब्ध झाली असून, आगामी काळात अधिकाधिक सुशिक्षित युवक पोलीस दलात सहभागी होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.