मुंबई : पार्थ पवार यांना मुंढवा जमीन खरेदी-गैरव्यवहार प्रकरणात अजूनही कुठलाही रिपोर्ट सरकारकडे आलेला नाही. अहवाल सरकारकडे नाही. समितीला 7 दिवसाची मुदतवाढ दिली आहे. 7 दिवसाच्या आत अंतिम अहवाल माझ्याकडे येईल, अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज, गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे. पार्थ पवार यांच्यावर पुण्यातील मुंढवा-कोरेगाव पार्क भागातील एका मौल्यवान भूखंडाबाबत गंभीर आरोप आहेत. 1800 कोटी रुपये बाजारमूल्य असलेला भूखंड अवघ्या 300 कोटींत ‘अमेडिया’ कंपनीने खरेदी केल्याचा दावा दमानिया यांनी केला आहे. या प्रकरणात इतर लोकांवर गुन्हे दाखल झाले असले, तरी मुख्य सूत्रधार असलेल्या पार्थ पवारांना का वाचवले जात आहे?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे प्रकरणी पार्थ पवार यांना दिलासा मिळणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गेल्या काही दिवसांपासून पार्थ पवार यांच्या अवतीभवती बऱ्याच घटना घडत आहे. एकीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान दुर्घटनेत अकाली निधन झाल्याने पवार कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यातच तातडीने राज्याचा दुसरा उपमुख्यमंत्री निवडणे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा गटनेतापद निवडणे, बारामतीमधील विविध संस्थावरील अध्यक्षपदांवरील निवडी हे सर्व राजकीय घडामोडी पार्थ पवारांच्या उपस्थितीत घडत आहेत. शिवाय, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यानंतर राज्यसभेवर खासदार म्हणून पार्थ पवार यांची वर्णी लागण्याचीही दाट शक्यताही व्यक्त केली जात आहे. त्यामुळे एकीकडे पुन्हा एकदा सक्रीय राजकारणात प्रवेश करतानाच दुसरीकडे जमीन व्यवहारप्रकरणी पार्थ पवारांवर घोटाळ्याचा ठपका लागण्याची शक्यता आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.