मुंबईत ऐन पावसाच्या सरी बरसत असताना मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती समोर येत आहे. सायन आणि माटुंगा स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने लोकल वाहतूक विस्कळीत झाली असून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे येणारी वाहतूक 20 मिनिटे उशिराने धावत आहे. तर कुर्ला स्थानकापासून धीम्या मार्गावरची वाहतूक जलद मार्गावर वळवण्यात आली आहे. त्यामुळे सकाळच्या वेळेस वाहतूक विस्कळीत झाल्यानं लोकलला लेट मार्क लागला असून, त्याचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे.
हेही वाचा- Mumbai Local Mega block : मुंबईच्या तिन्ही मार्गांवर दोन दिवस मेगाब्लॉक; विकेंडप्लॅन करण्यापूर्वी वेळापत्रक पाहा
मिळालेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेच्या सायन आणि माटुंगा रेल्वे स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायर तुटली, ज्यामुळे ऐन सकाळच्या वेळी कल्याण, ठाणे येथून छत्रपती शिवाज महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे येणारी लोकल 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत आहेत. तर सीएसएमटीच्या दिशेनं येणारी धीम्या मार्गावरील वाहतूक कुर्ला रेल्वे स्थानकातून जलद मार्गावर वळवण्यात आली आहे. वायर तुटल्यानं लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. परिणामी रविवारी बाहेर पडलेल्या प्रवाशांना उशीराचा सामना करावा लागत आहे.
मुंबईत अनेक भागात पावसाची हजेरी
मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईच्या विविध भागात आज सकाळपासूनच पावसाच्या हलक्या ते रिमझिम सरी कोसळत असल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबई उपनगरातील विक्रोळी, घाटकोपर, चुनाभट्टी, कुर्ला, नेहरूनगर, टिळक नगर तसेच पश्चिम उपनगरात अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव मालाड, विलेपार्ले, सांताक्रुज याठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली. अचानक झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून मुंबईकरांना उकाडा आणि गरमीच्या तडाख्यातून मोठा दिलासा मिळाला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.