मुंबई: आठवड्याच्या सुरुवातीलाच मध्य रेल्वेची सेवा मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाली असून प्रवाशांचे हाल वाढले आहेत. सोमवारी सकाळपासून लोकल गाड्या 20 ते 25 मिनिटे उशिराने धावू लागल्या आहेत. सीएसएमटीकडे जाणाऱ्या अनेक लोकल केवळ ठाण्यापर्यंतच धावत आहेत, तर काही गाड्यांचे मार्गक्रमणही बदलण्यात आले आहे.
कर्जत-बदलापूर मार्गावरील सुरू असलेल्या कामांचा थेट परिणाम मध्य रेल्वेच्या वेळापत्रकावर झाला आहे. रेल्वे ट्रॅकवरील देखभाल आणि तांत्रिक कामामुळे रेल्वे गाड्यांचा वेग मंदावला असून मोठ्या प्रमाणावर विलंब नोंदवला जात आहे. परिणामी कल्याण–ठाणे आणि पुढे सीएसएमटीकडे जाणाऱ्या सर्व लोकल सेवांमध्ये गोंधळाचे चित्र पाहायला मिळत आहे. सोमवार हा आठवड्याचा पहिला कार्यदिवस असल्याने नोकरदारांना कार्यालयात पोहोचण्यासाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अनेक प्रवाशांनी सकाळपासून प्लॅटफॉर्मवरच प्रतीक्षा करत राहिल्याची स्थिती निर्माण झाली.
लांब पल्ल्याच्या गाड्यांवरही या परिस्थितीचा मोठा परिणाम झाला आहे. अनेक रेल्वे गाड्या ट्रॅकवरच उभा आहेत. ट्रॅकवरील काम सुरू असल्याने वेग मर्यादा लागू करण्यात आली आहे, ज्यामुळे संपूर्ण सेवेत उशीर वाढत चालला आहे.
प्रवाशांनी संताप व्यक्त करत रेल्वे प्रशासनाकडे वेळेत माहिती देण्याची आणि सेवा लवकरात लवकर सुरळीत करण्याची मागणी केली आहे. “अनेकदा सोमवारी अशीच परिस्थिती निर्माण होते. वेळेत ऑफिसला पोहोचणे अवघड झाले आहे,” अशी प्रतिक्रिया अनेकांनी दिली. मध्य रेल्वेकडून मात्र सेवा पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.