अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयासमोर बॉम्बस्फोट झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना दुपारच्या सुमारास घडली. अफगाणिस्तानच्या काबुलमधील परराष्ट्र मंत्रालयासमोर हा बॉम्बस्फोट झाला आहे.रशियातील एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, परराष्ट्र मंत्रालयाच्या गेटच्या बाहेर स्फोट आणि गोळीबाराचा आवाज ऐकू आला. या महिन्याच्या सुरुवातीलाही काबूलमधील लष्करी विमानतळावर स्फोट झाला होता. अफगाणिस्तानच्या गृह मंत्रालयाचे प्रवक्ते नफी तकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत अनेक लोक ठार आणि जखमी झाले आहेत.
काबूलमधील सुरक्षा विभागाचे प्रवक्ते खालिद झद्रान यांनी ट्विट करून परराष्ट्र मंत्रालयाजवळ झालेल्या स्फोटात जीवितहानी झाल्याची माहिती दिली आहे. तसेच या घटनेची माहिती मिळताच सुरक्षा दल घटनास्थळी पोहोचल्याचं देखील झद्रान यांनी म्हटलं आहे.
ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबानने अफगाणिस्तानची सत्ता ताब्यात घेतली होती. त्यानंतर इस्लामिक स्टेट सक्रिय झाले असून त्यांनी एकामागून एक अनेक हल्ले केले आहेत. आजच्या हल्ल्याबाबत आतापर्यंत कोणतीही माहिती समोर आली नाही. मात्र यात इस्लामिक स्टेटचा हात असू शकतो, असे मानले जात आहे. इसिसचा आरोप आहे की, तालिबान आपल्या विचारसरणीपासून दूर गेले आहेत आणि ते पाश्चिमात्य देशांच्या इशाऱ्यावर काम करत आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.