मुंबई महापालिका निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या राजकारणात हालचाली तीव्र झाल्या असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटाकडून आगामी युतीच्या समीकरणांवर नव्याने मंथन सुरू असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. विशेषतः उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पक्षांशी जवळीक वाढवण्याबाबत पक्षात सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर आज मुंबईतील सिल्व्हर ओक निवासस्थानी शरद पवार गटाच्या मुंबई प्रदेशाची एक महत्त्वपूर्ण बैठक होत आहे.
या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार स्वतः उपस्थित राहणार असून, मुंबई महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीसोबत लढताना पक्षाने किती जागांवर दावा करावा, यावर सविस्तर चर्चा होणार आहे. मुंबई प्रदेशाध्यक्ष राखी जाधव यांच्याकडून जागावाटपाबाबतचा औपचारिक प्रस्ताव मांडला जाणार असून, रविवारी होणाऱ्या महाविकास आघाडीच्या संयुक्त बैठकीपूर्वी ही चर्चा राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे.
हेही वाचा: Dadar : दादर स्टेशन परिसरात मनोरुग्णाचा धुमाकूळ; अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न
पक्षातील सूत्रांच्या माहितीनुसार, सध्या शरद पवार गटाकडून 22 जागांचा प्राथमिक प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. मात्र, पक्षातील काही नेते किमान 25 ते 30 जागांवर निवडणूक लढवण्याच्या भूमिकेत असून, त्यानुसार जागांची मागणी वाढण्याची शक्यता आहे. काही स्तरावर अधिक आक्रमक भूमिका घेत 40 ते 50 जागांपर्यंतचा दावा करण्याचे मतही व्यक्त होत आहे. तथापि, लोकसभा निवडणुकीतील अनुभव लक्षात घेता कमी जागा लढवून अधिक प्रभावी निकाल साधण्यावर पक्षाचा भर राहण्याची शक्यता आहे.
दरम्यान, बुधवारी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी मुंबईतील स्थानिक नेत्यांची बैठक घेऊन युतीबाबतची भूमिका जाणून घेतली. या बैठकीत काँग्रेसपेक्षा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना आणि राज ठाकरे यांच्या मनसेसोबत निवडणूक लढवावी, अशी स्पष्ट भूमिका बहुसंख्य नेत्यांनी मांडल्याचे पक्षातील सूत्रांचे म्हणणे आहे. याआधी झालेल्या कार्यकर्ता बैठकीतही ठाकरे बंधूंशी युती करण्याची मागणी जोर धरताना दिसली होती.
2017 च्या मुंबई महापालिका निवडणुकीत एकसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचे 9 नगरसेवक निवडून आले होते. सध्या विशेषतः मुंबईच्या पूर्व उपनगरात पक्षाची संघटनात्मक ताकद वाढल्याचा दावा शरद पवार गटाकडून केला जात आहे. याच बळावर आगामी निवडणुकीत किमान 25 ते 30 नगरसेवक निवडून आणण्याचे ध्येय ठेवण्यात आले असून, आज होणाऱ्या बैठकीत निवडणूक रणनीती, संघटना बळकटीकरण आणि युतीचे स्वरूप यावर सखोल चर्चा होणार आहे. उद्धव आणि राज ठाकरे यांच्याकडे नेमकी किती जागांची मागणी केली जाणार, याकडे मुंबईच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून, येत्या दोन दिवसांत याबाबत अंतिम भूमिका स्पष्ट होईल.
हेही वाचा: EPFO New Rule: कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! EPFOकडून मोठ्या घोषणा, आता सुट्ट्या…
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.