कोरोनाच्या काळातही महाविकास आघाडी सरकारकडून ढिसाळ नियोजन झाले होते. त्यामुळे त्या सरकारावरही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायचा का? असा सवाल उपस्थित करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता अप्रत्यक्षपणे त्यांच्या कारभारावर टीका केली होती. राज ठाकरे यांच्या या टीकेचा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी समाचार घेतला आहे. भाजपने काही पोपट विकत घेऊन पाळून ठेवले आहेत. ते बोलत असतात. राज ठाकरे हे विश्वनेते आहेत, अशा शब्दात संजय राऊत यांनी राज ठाकरे यांची खिल्ली उडवली.
भाजपने एवढे पोपट पाळून ठेवले आहेत. त्यांना बोलू दया. पोपटपंची करू द्या. नोटबंदी काळात रांगेत हजारो लोक मेले हा सदोष मनुष्यवधच आहे ना? त्यावरही या भाजपच्या पोपटांनी बोलायला हवे. गंगेत हजारो प्रेते वाहत आली. गुजरातला स्मशानात जागा नव्हती. मग गुजरात आणि उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी विश्वनेत्याने केली पाहिजे. ते जगाचे नेते आहेत. ते ट्रम्प यांच्याबद्दलही बोलू शकतात. करा मागणी, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
काय मागण्या करता? कुणासाठी करता? खारघरला लोकं तडफडून मेले. बाजूला मेजवाण्या सुरु होत्या. पण लोकांना प्यायला पाणी नव्हते. त्यावर बोला. ढिसाळ नियोजनावर बोला. कशा करता सर्व कार्यक्रम केला त्यावर बोला. उठसूट उद्धव ठाकरे… उद्धव ठाकरे… सुरू आहे. झोपेतही उद्धव ठाकरे आणि जागेपणी उद्धव ठाकरेच सुरू आहे, असे चिमटेही त्यांनी काढले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.