माझ्याशी लग्न कर, नाहीतर आई वडिलांचे मुंडके उडवीन; शाळकरी मुलीला धमकी

कोऱ्हाळे खुर्द गावातील एका 15 वर्षीय दहावीत शिकत असलेल्या विद्यार्थिनीने एका युवकाच्या मानसिक त्रासाला कंटाळून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
माझ्याशी लग्न कर, नाहीतर आई वडिलांचे मुंडके उडवीन; शाळकरी मुलीला धमकी

पुणे: बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे खुर्द या गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोऱ्हाळे खुर्द गावातील एका 15 वर्षीय दहावीत शिकत असलेल्या विद्यार्थिनीने एका युवकाच्या मानसिक त्रासाला कंटाळून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना 7 एप्रिल 2025 रोजी कोऱ्हाळे खुर्द या गावात घडली असून, या घटनेमुळे बारामती परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

आकाशात भरारी घेणाऱ्या विद्यार्थिनीच्या स्वप्नांची राखरांगोळी:

माहितीनुसार, आत्महत्या केलेली विद्यार्थिनी नुकतीच दहावीची परीक्षा देऊन आकाशात भरारी घेण्याचे स्वप्न रंगवत होती. मात्र, गावातीलच विशाल दत्तात्रय गावडे नावाच्या युवकाने वारंवार तिला त्रास देत तिच्यावर लग्नासाठी दबाव टाकत होता. इतकंच नाही, तर विशाल आणि त्याचे साथीदार प्रवीण नामदेव गावडे, शुभम सतीश गावडे आणि सुनील हनुमंत खोमणे हे देखील पीडित विद्यार्थिनीचा पाठलाग करत होते. त्यासोबतच, आरोपी विशाल गावडे याने पीडित विद्यार्थिनीला तिच्या मोबाईलवर अश्लील मेसेजेस, धमक्या, आणि शस्त्र दाखवून भीती निर्माण करू लागला.

हद्द तर तेव्हा पार झाली जेव्हा विशाल गावडे याने पीडित विद्यार्थिनीला थेट, 'तू माझ्याशी लग्न नाही केलीस तर तुझ्या आई-वडिलांचे मुंडके उडवीन', अशी धमकी दिली. त्याच्या या धमकीमुळे पीडित विद्यार्थिनी अत्यंत घाबरली होती. ती मानसिकदृष्ट्या खचून गेली होती. गेल्या अनेक महिन्यांपासून होत असलेल्या दबाव, धमक्या आणि पाठलागामुळे ती पूर्णपणे गोंधळून गेली होती आणि तिने टोकाचं पाऊल उचलून स्वत:चं आयुष्य संपवलं.

घटनेनंतर बारामती तालुक्यात संतापाची लाट:

या घटनेनंतर, कोऱ्हाळे खुर्द गावासोबतच संपूर्ण बारामती तालुक्यात संतापाची लाट उसळली. आरोपी विशाल गावडे आणि त्याच्या साथीदारांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणी, वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधानाच्या कलम 107, 78, 296, 352, 351 या अंतर्गत आणि 'पॉक्सो' कायदा लागू करण्यात आला आहे. त्यासोबतच, अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या या प्रकरणावर अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. पोलिसांनी तातडीने चारही आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून अधिक कसून चौकशी केली जात आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version