छत्रपती संभाजीनगर शहरातील गुन्हेगारीचं जाळं दिवसेंदिवस आणखी दाट होत चाललं असून, शहरात पुन्हा एकदा अचंबित करणारी घटना घडली आहे. रुग्णालयासारख्या सुरक्षित मानल्या जाणाऱ्या ठिकाणीच चार तोळे सोनं रहस्यमयरीत्या गायब झाल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना अदालत परिसरातील एका खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान घडल्याचं उघड होताच नागरिकांमध्ये संशयाचे ढग आणखी गडद झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या रुग्णाच्या अंगावर असलेले चार तोळे सोनं अचानक गायब झाल्याचं नातेवाईकांच्या लक्षात आलं. रुग्ण गंभीर अवस्थेत असल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यातच नातेवाईकांची धावपळ सुरू होती, दरम्यान कुणीतरी संधी साधून मृत झालेल्या या रुग्णाच्या अंगावरील हे सोनं लंपास केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्था, सीसीटीव्ही कॅमेरे आणि कर्मचाऱ्यांची वर्दळ यामुळे गुन्हा अत्यंत कौशल्याने केला गेल्याचं प्राथमिक अंदाज आहे. घटनेची माहिती मिळताच क्रांती पोलीस ठाण्याचे पथक रुग्णालयात दाखल झाले. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज जप्त करून तपासाची चक्रं वेगाने फिरवण्यास सुरुवात केली आहे. मात्र आतापर्यंत कोणतेही ठोस धागेदोरे हाती न लागल्याने तपास अधिकच गुंतागुंतीचा होत चालला आहे.
या संपूर्ण प्रकरणामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रुग्णालयातच सोनं चोरी होऊ शकतं, हा विचारच नागरिकांना असुरक्षित करणार आहे. गुन्हा नेमका कुणी केला? त्यामागे घरातीलच कोणाचा हात आहे का? की एखाद्या नव्या टोळीने रुग्णालयात प्रवेश केला? या सर्व प्रश्नांची उत्तरं अद्याप मिळालेली नाहीत. तपासाचा पुढील टप्पा कोणते धक्कादायक वळण घेईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा: Maulana Mahmood Madani : ‘..तर जिहाद होईलच’, मौलाना महमूद मदानींचं वादग्रस्त वक्तव्य
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.