औरंगाबादमध्ये कचऱ्याच्या प्रश्नांवरून गाडीची तोडफोड

औरंगाबादमध्ये कचऱ्याच्या प्रश्नांवरून गाडीची तोडफोड

जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद

गेल्या कित्येक वर्षांपासून शिवसेनेची महापालिकेत सत्ता असलेल्या औरंगाबाद शहरात सध्या नागरिकांना श्वास घेणंही कठीण झालं आहे. कारण, गेल्या 16 दिवसांपासून शहराचा कचरा उचलला गेला नाही आहे.

त्यामुळे औरंगाबादमधल्या कचरा प्रश्नाने आता तीव्र रुप धारण केलं आहे. कचऱ्यामुळं हैराण झालेल्या संतप्त नागरिकांनी कचऱ्याची गाडी फोडली आणि कचराडेपोच्या परिसरात ठिय्या आंदोलन सुरु केलं आहे. एवढचं नाही तर महापुरुषांचे फोटो समोर ठेवून नागरिक भजन आणि आंदोलन करत आहेत. आज कचरा न उचलण्याचा सोळावा दिवस होता. सोळाव्या दिवशी देखील महापालिकेने कचरा न उचलल्याने नागरिकांना संतप्त झाले आहेत.

एक छोटी गाडी (रिक्षा) कचरा घेऊन आली असता नागरिकांनी त्यावर दगडफेक केली. यावेळी जमावाला समजवण्यासाठी आलेल्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांनाही नागरीकांनी धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न झाला.

दरम्यान, औरंगाबादचा कचरा प्रश्न सोडवण्यासाठी आज विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. सर्व अधिकारी आणि नारेगावचे ग्रामस्थ या बैठकीला उपस्थित होते. त्यांना 3 महिने मुदतीची मागणी करत त्याबाबतचे प्रश्न सोडवण्यासाठी, नारेगावच्या विकासासाठी विशेष निधी देण्याचीही आयुक्तांनी तयारी दर्शवली.

मात्र गावकरी त्यांच्या निर्णयावर ठाम राहत, कुठल्याही परिस्थितीत माघार घेण्याच्या तयार नाहीत. त्यामुळे पुन्हा बैठक होण्याची शक्यता आहे.

औरंगाबादपासून 15 किलोमीटर लांब असलेल्या नारेगावच्या कचरा डेपोत सध्या कचरा टाकला जातो. मात्र, तिथल्या ग्रामस्थांनी कचरा टाकण्यास विरोध केल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे. कचऱ्यावर कुठलीही प्रक्रिया होत नसल्याने आणि त्याची विल्हेवाट नीट लावली जात नसल्याने रोगराई वाढल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

विशेष म्हणजे हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने राज्य सरकारला या प्रकरणात लक्ष घालण्याचे आदेश दिले आहेत. मात्र अद्याप कुठलाही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे आज नारेगावच्या ग्रामस्थांशी होणाऱ्या चर्चेत विभागीय आयुक्तांना यश मिळतं का? हे पाहणं महत्त्वाचं आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version