जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद
शेतकऱ्यांसाठी एक मोठा अलर्ट आहे. तुम्ही नामांकित ब्रँडची समजून जी बियाणं घेता ती कदाचित बनावट असू शकतील. औरंगाबादेत उघडकीस आलेलं रॅकेट धक्कादायक आहे. त्यामुळे आता बियाणं विकत घेताना जास्त काळजी घ्या.
कृषी महाविद्यालयाचं, ग्रेडरचं प्रमाणपत्रही बनावट असू शकेल. एका नामांकित बॅंडचा भागिदारच हा बनावट बियाणांच्या रॅकेटचा सूत्रधार निघालाय. बळी मात्र सामान्य शेतकऱ्यांचा जातोय. बोगस बियाणे विकून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या एका बोगस बियाणांची कंपनी औरंगाबाद पोलिसांनी उद्धवस्त केली आहे.
औरंगाबादमधील बियाणे उत्पादित करणाऱ्या एका नामांकित कंपनीच्या नावानं ही बनावट कंपनी बियाणे तयार करून विकायची. केवळ औरंगाबाद जिल्हा नाही तर विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातही या कंपनीने आपला विस्तार वाढवून कोट्यवधी रुपयाचे बियाणे शेतकऱ्यांना विकणे सुरु ठेवले होते.
काही शेतकऱ्यांच्या तक्रारी आणि पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे औरंगाबाद शहर पोलिसांनी या बनावट कंपनीवर छापा टाकला. यासोबतच कंपनीच्या बुलढाणा, नगर आणि औरंगाबादच्या गोडाऊनवर छापे टाकत लाखो रुपयांचे बियाणे जप्त करण्यात आले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.