छत्रपती संभाजीनगर शहरात शुक्रवारी मध्यरात्री एशियन हॉस्पिटलमध्ये अचानक आग लागल्याने काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. रुग्णालयाच्या बाल अतिदक्षता विभागात म्हणजेच पीआयसीयूमध्ये ही घटना घडली. त्यावेळी या विभागात तब्बल 9 शिशूंवर उपचार सुरू होते. मध्यरात्रीच्या सुमारास आग लागल्याचे लक्षात येताच रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचारी आणि प्रशासनाने क्षणाचाही विलंब न करता बचावकार्य सुरू केले. पीआयसीयूमधील शिशूंची प्रकृती नाजूक असल्याने त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढणे हे मोठे आव्हान होते. मात्र, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तातडीने हालचाली करत सर्व ९ शिशूंना सुरक्षितपणे बाहेर काढले. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि मोठ्या संख्येने रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या.
शिशूंना पुढील उपचारांची आवश्यकता लक्षात घेऊन त्यांना घाटी रुग्णालयासह शहरातील इतर खासगी रुग्णालयांमध्ये हलविण्यात आले. अत्यंत काळजीपूर्वक आणि वैद्यकीय देखरेखीखाली हे स्थलांतर करण्यात आले. शिशूंना रुग्णवाहिकांमधून हलवताना डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी विशेष खबरदारी घेतली. आग लागल्यानंतर काही वेळातच रुग्णालय परिसरात बचावकार्याला वेग आला. डॉक्टर, नर्सिंग स्टाफ, रुग्णवाहिका चालक आणि पोलिसांनी एकमेकांशी समन्वय साधत परिस्थिती हाताळली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. सध्या सर्व ९ शिशू सुरक्षित असल्याची माहिती असून, त्यांना ज्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे, तेथे वैद्यकीय पथकांकडून त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. दरम्यान, रुग्णालयातील आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली, याबाबतची अधिकृत माहिती आणि पुढील तपासाची माहिती समोर येणे अपेक्षित आहे
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.