आषाढी एकादशी आणि त्यानंतरच्या गुरुपौर्णिमेनिमित्त श्रीक्षेत्र पंढरपूर येथे जाणाऱ्या वारकऱ्यांची वाढती गर्दी लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) नाशिक विभागाने विशेष नियोजन केले आहे. 20 ते 28 जुलै या कालावधीत नाशिक विभागातून पंढरपूरसाठी तब्बल 300 जादा विशेष बसेस सोडण्यात येणार असून भाविकांना सुरक्षित, सुलभ आणि वेळेत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
नाशिक विभागातील 13 आगारांतून या विशेष बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. यात्रेकरूंची संख्या लक्षात घेऊन आवश्यकतेनुसार बससेवा वाढविण्यात येणार असून, प्रवाशांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी एसटी प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली आहे.
याशिवाय, एखाद्या गावातून किंवा परिसरातून 40 किंवा त्यापेक्षा अधिक भाविकांची एकत्रित मागणी झाल्यास त्या गावातून थेट पंढरपूरसाठी विशेष एसटी बस उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे वारकऱ्यांना जवळच्या आगारापर्यंत येण्याची गरज भासणार नाही आणि त्यांचा प्रवास अधिक सोयीचा होणार आहे.
आषाढी एकादशी आणि गुरुपौर्णिमेदरम्यान लाखो भाविक पंढरपूरकडे रवाना होत असल्याने एसटी महामंडळाने यंदाही विशेष वाहतूक व्यवस्था उभारली आहे. भाविकांनी आपल्या जवळच्या एसटी आगाराशी संपर्क साधून विशेष बससेवेची माहिती घ्यावी तसेच समूहाने प्रवास करण्यासाठी आगाऊ नोंदणी करावी, असे आवाहन एसटी प्रशासनाने केले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.