राज्यात नामांकित असलेल्या अमूल आणि गोकुळ या दुधाच्या नावाखाली गेल्या पाच वर्षांपासून गोरखधंदा सुरु असल्याचा प्रकार समोर आला आहे. अमूल आणि गोकुळ या नामांकित दुधाच्या नावाखाली भेसळयुत्त दूध विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार मुंबई क्राइम ब्रँचने उघडकीस आणला आला. मुंबईच्या दहिसर येथील एका परिसरात अमूल आणि गोकुळ या नामांकित कंपन्यांच्या दुधाच्या पिशव्यांमधील दूध काढून त्यात घाण पाणी भरून त्या पुन्हा सील करून ओरिजनल दूध म्हणून विक्री करणाऱ्या चार भेसळखोरांना मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रँच युनिट-12 ने बेड्या ठोकल्या आहेत.
या रॅकेटच्या मुख्य आरोपीला तेलंगणातून अटक करण्यात आली असून पोलिसांनी पालघर जिल्ह्यातील वसई पूर्व परिसरातील वालीव फाटा येथे बाबूभाई शहाणी कंपाऊंडमध्ये छापा टाकला. यावेळी पोलिसांना लक्ष्मी इंडस्ट्रिअल इस्टेटसमोरील परिसरात पोलिसांना बनावट दूध पिशव्या तयार करणारी फॅक्टरी आढळून आली.
या ठिकाणी बनावट पिशव्या तयार करण्यासाठी वापरली जाणारी मशीनरी, प्लास्टिक साहित्य आणि दूध भेसळीसाठी वापरण्यात येणारी विविध उपकरणे पोलिसांनी जप्त केली. यादरम्यान 13 हजार बनावट अमूल दूध पिशव्या, अमूल आणि गोकुळच्या सुमारे 470 लीटर दुधाचा साठा आणि 10 लाख रुपये किंमत असणारी मशीनरी असा एकूण 10 लाख 79 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
या रॅकेटमार्फत हे आरोपी अमूल गोल्ड, अमूल ताजा आणि गोकुळ या नामांकित कंपनीच्या दुधाच्या पिशव्या कापून आरोपी त्यातील दूध बाहेर काढायचे. त्यानंतर त्या पिशव्यांमध्ये घाण पाणी भरले जायचे. या पिशव्या पुन्हा सील करून बाजारात असते त्या प्रमाणे दूध आहे, असे भासवून त्याची विक्री केली जायची, अशी माहिती पोलिसांनी दिली. 2021 पासून मुंबई आणि मुंबई उपनगरांमध्ये दूध भेसळीसाठी वापरल्या जाणाऱ्या बनावट दूध पिशव्यांचा पुरवठा करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.