Ambergris: अलिबाग पोलिसांची मोठी कारवाई! तब्बल 4 कोटींची व्हेल माशाची उलटी जप्त; पहाटेच्या कारवाईत आरोपी जेरबंद

रायगडमधील अलिबाग पोलिसांनी विशेष कारवाई करत सुमारे चार कोटी रुपये किमतीचे अँबरग्रीस जप्त केले.
Ambergris: अलिबाग पोलिसांची मोठी कारवाई! तब्बल 4 कोटींची व्हेल माशाची उलटी जप्त; पहाटेच्या कारवाईत आरोपी जेरबंद

रायगड: रायगड जिल्ह्यातील अलिबाग पोलिसांनी वन्यजीव तस्करीविरोधात मोठी कारवाई करत तब्बल चार कोटी रुपये किमतीचे अँबरग्रीस (व्हेल माशाच्या उलटीसदृश पदार्थ) जप्त केले आहे. पहाटेच्या विशेष गस्तीदरम्यान ही कारवाई करण्यात आली असून, या प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईमुळे वन्यजीव तस्करीच्या संभाव्य रॅकेटबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अलिबाग तालुक्यातील चाळमाळा जेटी परिसरात पोलिसांकडून नियमित गस्त घालण्यात येत होती. यावेळी पहाटे सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास एका दुचाकीस्वाराची हालचाल संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्याला अडवून चौकशी केली. त्यानंतर दुचाकीची सखोल तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान डिकीत ठेवलेल्या कापडी पिशवीत अँबरग्रीस असल्याचा संशय असलेला पदार्थ आढळून आला.

हेही वाचा: India vs Zimbabwe 3rd T20: हरारेत भारतीय संघाचा डंका! 35 धावांनी विजय मिळवत झिम्बाब्वेला लोळवलं; मालिकेत 'क्लीन स्वीप'

पोलिसांनी जप्त केलेल्या या पदार्थाचे वजन सुमारे चार किलो असल्याचे सांगितले जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात अँबरग्रीसला मोठी मागणी असल्यामुळे त्याची किंमत कोट्यवधी रुपयांपर्यंत पोहोचते. प्राथमिक अंदाजानुसार, जप्त करण्यात आलेल्या अँबरग्रीसची किंमत सुमारे चार कोटी रुपये आहे. याशिवाय आरोपीकडील दुचाकीही पोलिसांनी जप्त केली असून, एकूण जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे सव्वाचार कोटी रुपयांच्या घरात असल्याची माहिती समोर आली आहे.

या प्रकरणी राहुल पंढरीनाथ हातणी या संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. प्राथमिक चौकशीत त्याच्याविरुद्ध यापूर्वी कोणताही गुन्हा दाखल नसल्याचे समोर आले आहे. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणात अँबरग्रीस त्याच्याकडे कसे आले, त्यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का आणि त्याचा पुरवठा कुठे होणार होता, याचा तपास आता पोलीस करत आहेत.

अँबरग्रीस हा पदार्थ स्पर्म व्हेलमधून तयार होणारा दुर्मिळ नैसर्गिक पदार्थ मानला जातो. सुगंधी द्रव्यांच्या उद्योगात त्याचा वापर होत असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात त्याला मोठी किंमत मिळते. मात्र, वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत अशा पदार्थांची बेकायदेशीर खरेदी-विक्री आणि तस्करी हा गंभीर गुन्हा मानला जातो.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version