मंदिरांमध्ये चेंगराचेंगरीच्या अनेक घटना तुम्ही ऐकल्या असतील. अशीच एक घटना अकोल्यातील बाळापूर तालुक्यातल्या मनारखेड गावात हनुमान मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्यात घडली आहे. मंदिराच्या कळसावरून हजारो रुपयांच्या नोटांची आणि नाण्यांची उधळण करण्यात आली.
नोटांची उधळण केल्यानंतर त्या नोटा गोळा करण्यासाठी मात्र भाविकांची झुंबड उडाली. यामुळे मोठी गर्दी झाल्याने मंदिर परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाल्याचं दिसून आलं.
समोर आलेल्या माहितीनुसार, मंदिराच्या कळसावरून 10, 20 आणि 50 रुपयांच्या हजारो नोटा उधळण्यात आल्या. यासोबतच 5 आणि 10 रुपयांची नाणीही उधळण्यात आली. या नोट जमा करण्यासाठी काही जण थेट मंदिरात उभारलेल्या मंडपावर चढण्याचा प्रयत्न करत होते, तर काहीजण वाऱ्याच्या दिशेने उडणाऱ्या नोटांच्या मागे धावताना दिसले.
या सगळ्या प्रकारामुळे चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती निर्माण झाली. मात्र सुदैवाने यावेळी कोणतीही दुर्घटना झाली नाही. या सर्व प्रकाराचे गावकऱ्यांनी समर्थन केले आहे. हा भक्तीचाच भाग असल्याचेही गावकरी म्हणाले. या प्रकारामुळे मंदिराच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.