विरोधी पक्ष नेते अजित पवार हे आपल्या काही कार्यकर्त्यांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेले आहेत. त्यांच्यासोबत छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील हे नेते उपस्थित होते.
नव्या सरकारचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच नगर विकास विभागातील कामांना स्थगिती दिली आहे. २०२१ मध्ये सुरू करण्यात आलेल्या कामांना स्थगिती दिली असल्यामुळे त्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी अजित पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, सत्तेत आल्यानंतर लगेचच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राष्ट्रवादी आणि अजित पवारांना चांगलाच दणका दिला आहे. त्यांनी नगरविकास विभागाच्या ९४१ कोटींच्या कामांना स्थगिती दिली आहे. यामध्ये बारामती नगरपरिषदेला मोठ्या प्रमाणावर निधी मिळाला होता.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नगरविकास विभागाच्या मार्च ते जून २०२२ मध्ये मंजूर झालेल्या ९४१ कोटींच्या कामांना स्थगिती दिली होती. यातही महत्त्वाची बाब म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीच्या आमदारांनी सुचवलेल्या कामांना स्थगिती देण्यात आली आहे. त्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी अजित पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले असल्याची माहिती आहे. सूडबुद्धीने निर्णय घेऊ नका आणि कामांना स्थगिती देऊ नका अशी विनंती यावेळी अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.