जळगाव: काश्मीरमधील पहेलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध केलेल्या एअर स्ट्राईकचा थेट परिणाम आर्थिक बाजारांवर आणि विशेषतः सोन्याच्या दरांवर दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर जळगावसह संपूर्ण देशभरातील सुवर्ण बाजारात खळबळ माजली असून, सोन्याचे दर इतिहासात प्रथमच जीएसटीसह 1 लाख 425 रुपयांवर पोहोचले आहेत.
गेल्या 48 तासांत सोन्याच्या दरात तब्बल 3,500 रुपयांची उसळी झाली आहे. दोन दिवसांपूर्वी 93,800 रुपये प्रति तोळा असलेला दर आता 97,200 रुपयांवर पोहोचला आहे. यावर 3 टक्के जीएसटीची भर पडल्यावर हा दर 1 लाख 425 रुपयांवर गेला आहे. जळगाव ही राज्यातील एक प्रमुख सुवर्ण नगरी मानली जाते आणि येथे सोन्याच्या किंमतीतील हलचाली नेहमीच लक्षवेधी ठरतात. त्यामुळे याठिकाणी निर्माण झालेली खळबळ अधिक तीव्र जाणवते.
स्थानिक सुवर्ण व्यापाऱ्यांच्या मते, देशात निर्माण झालेली युद्धजन्य स्थिती आणि जागतिक बाजारातील अस्थिरता यामुळे गुंतवणूकदारांचा कल पुन्हा एकदा पारंपरिक सुरक्षित गुंतवणुकीकडे, म्हणजेच सोन्याकडे वळला आहे. परिणामी मागणी वाढल्याने दरात लक्षणीय वाढ होत आहे. याशिवाय डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण, जागतिक पातळीवरील कच्च्या तेलाचे दर, महागाईचा आलेख आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी हेही सोन्याच्या दरवाढीचे प्रमुख कारण असल्याचे सांगण्यात येत आहे.
एकीकडे, ग्राहकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून, काहींनी सध्याचे दर अजूनही स्थिरावले नसल्याने खरेदी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे, अनेक गुंतवणूकदार आणि दीर्घकालीन ग्राहकांनी अजूनही दर वाढतील या भीतीने तातडीने खरेदीस सुरुवात केली आहे. त्यामुळे शहरातील दागिने दुकाने आणि सराफ बाजारात चांगलीच गर्दी पाहायला मिळत आहे.
तज्ज्ञांच्या मते, जर भारत-पाकिस्तानमधील तणाव अधिक वाढला, तर सोन्याचे दर पुढील काही दिवसांत आणखी वाढू शकतात. काही अंदाजानुसार हे दर 1 लाख 5 हजार रुपयांपर्यंत जाऊ शकतात. त्यामुळे सामान्य ग्राहकांनी विवेकाने गुंतवणुकीचे निर्णय घ्यावेत, असा सल्लाही दिला जात आहे.
सोन्याच्या वाढत्या किमतींमुळे जळगावसारख्या सुवर्ण नगरीत एकच खळबळ उडाली आहे. व्यापाऱ्यांचे गणित बिघडले असून, ग्राहकही गोंधळून गेले आहेत. युध्दजन्य पार्श्वभूमीवरील हा आर्थिक धक्का केवळ जळगावपुरता मर्यादित न राहता, संपूर्ण देशातील अर्थव्यवस्थेवर परिणाम करू शकतो.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.