First Dog Crematorium in India : प्राण्यांमध्ये कुत्रा हा माणसाचा सर्वात विश्वासू मित्र मानला जातो. मात्र, अनेकदा रस्ते अपघातात किंवा आजाराने कुत्र्याचा मृत्यू झाला की त्याच्या मृतदेहाची विटंबना होताना दिसते. हीच बाब लक्षात घेऊन अहमदाबाद महानगरपालिकेने (AMC) एक अत्यंत संवेदनशील पाऊल उचलले आहे. गुजरातमधील अशा प्रकारचे हे पहिले आणि देशातील महानगरपालिकेद्वारे चालवले जाणारे शहरी भागातील पहिले ‘सीएनजी’ आधारित श्वान स्मशानगृह/शवदाहिनी (Dog Crematorium) जमालपूर ते खोडियारनगर रोड दरम्यान सुरू करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे पेट लव्हर्सना आपल्या लाडक्या पाळीव प्राण्याला सन्मानाने निरोप देणे शक्य होणार आहे.
आधुनिक तंत्रज्ञान आणि पर्यावरणपूरक यंत्रणा
सुमारे 30 लाख रुपये खर्चून तयार करण्यात आलेल्या या स्मशानभूमीत एकाच वेळी 3 कुत्र्यांवर अंत्यसंस्कार करण्याची क्षमता आहे. ही मशीन 800 ते 900 अंश सेल्सिअस तापमानावर काम करते, ज्यामुळे संसर्गजन्य विषाणू पूर्णपणे नष्ट होतात. विशेष म्हणजे, यामध्ये प्रायमरी आणि सेकंडरी चेंबर्स असल्यामुळे धुराड्यातून कोणताही दुर्गंधीयुक्त किंवा रंगीत धूर बाहेर पडत नाही. एका कुत्र्याच्या अंत्यसंस्कारासाठी साधारणपणे 14 युनिट नैसर्गिक गॅसचा वापर होतो, ज्याचा खर्च सुमारे 700 रुपये इतका येतो. मृत प्राण्याला हात न लावता ऑटोमॅटिक ट्रॉली सिस्टिमद्वारे मशीनपर्यंत नेण्याची सुविधाही येथे उपलब्ध आहे.
हेही वाचा – Road Accident News: लग्नाचा आनंद ठरला शेवटचा; महामार्गावर भीषण अपघात; एकाच गावातील सहा तरुणांचा मृत्यू
घरबसल्या ‘लाईव्ह’ अंत्यदर्शन आणि अस्थीसंचय
अहमदाबाद पालिकेने या प्रक्रियेत माणुसकी जपण्यासाठी विशेष व्यवस्था केली आहे. स्मशानभूमीत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून, पाळीव कुत्र्याचा मालक आपल्या घरबसल्या मोबाईलवर अंत्यसंस्काराचे थेट प्रक्षेपण पाहू शकतो. ज्यांना प्रत्यक्ष उपस्थित राहायचे आहे, त्यांच्यासाठी 6 बाकड्यांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. अंत्यसंस्कार पूर्ण झाल्यानंतर कुत्र्याच्या अस्थी किंवा राख एका लाल कापडात गुंडाळून सन्मानपूर्वक मालकाच्या घरी पोहोचवली जाते. याशिवाय, दरवर्षी पुण्यतिथीनिमित्त मालकाला एक स्मृती संदेश आणि फोटो/व्हिडिओ पाठवण्याची सोयही करण्यात आली आहे.
#WATCH | Ahmedabad: Gujarat's first CNG-based dog crematorium becomes operational. Employee Ajmeri Liyakat Ali says, "This is specifically for pet dog owners… When people bring their pets here, we place them on a stretcher." The process takes at least two to three hours.… pic.twitter.com/Otuu80pJhx — ANI (@ANI) February 10, 2026
नोंदणी प्रक्रिया आणि आरोग्याचे महत्त्व
शहरात सध्या 16,843 मालकांनी 19,162 पाळीव कुत्र्यांची नोंदणी केली आहे. ज्यांचा कुत्रा नोंदणीकृत आहे, त्यांना 155303 या क्रमांकावर कॉल करून ही सेवा मिळवता येते. जर कुत्रा नोंदणीकृत नसेल, तर ऑनलाईन डोनेशन देऊन तात्काळ सेवा घेता येते. जमिनीखाली मृतदेह पुरल्याने माती प्रदूषित होते आणि ‘रेबीज’ किंवा ‘कॅनाइन डिस्टेंपर’ सारखे विषाणू पसरण्याचा धोका असतो. वैज्ञानिक पद्धतीने अंत्यसंस्कार केल्यामुळे हा धोका टळतो. भविष्यात वाढती मागणी लक्षात घेऊन शहर परिसरात आणखी 2 अशी स्मशानगृहे उभारण्याची पालिकेची योजना आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.