अभिनेते सतीश कौशिक यांचे निधन

अभिनेते सतीश कौशिक यांचे निधन

चित्रपट दिग्दर्शक आणि अभिनेते सतीश कौशिक यांचं निधन झालं आहे. ते ६६ वर्षांचे होते. दिल्लीत असताना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झालं. सतीश कौशिक यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यांचे जवळचे मित्र आणि बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर यांनी याबाबतची माहिती दिली आहे. अनुपम यांनी एका ट्विटद्वारे ही दुःखद बातमी दली आहे. दोन दिवसांपूर्वी सतीश कौशिक यांनी जावेद अख्तर यांच्या घरी आयोजित केलेल्या होळी पार्टीत हजेरी लावली होती. त्यांनी ट्विट करत कलाकारांसोबत होळीचे काही फोटोही शेअर केले होते. दरम्यान त्यांच्या अशा अचानक जाण्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.

सतीश चंद्र कौशिक यांचा जन्म १३ एप्रिल १९५६ रोजी हरियाणामध्ये झाला. ते प्रसिद्ध अभिनेते आणि चित्रपट दिग्दर्शक होते. चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी त्यांनी अनेक नाटकांमध्येही काम केलं. सतीश कौशिक यांनी मिस्टर इंडिया, दीवाना मस्ताना, साजन चले ससुरालसह अनेक हिंदी चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका केल्या आहेत. तसेच त्यांनी रूप की रानी चोरों का राजा, प्रेम, हम आपके दिल में रहते है आणि तेरे नाम यासारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. १९८३ मध्ये ‘जाने भी दो यारो’ या चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपट सृष्टीत पदार्पण केलं.

सतीश कौशिक यांनी प्रामुख्याने एक विनोदी अभिनेता अशी आपली छाप पाडली होती. गोविंदासोबत त्यांनी अनेक विनोदी सिनेमे केले आहेत. त्यांची जोडी प्रचंड लोकप्रिय होती. ४ दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी जवळपास १०० चित्रपटांमध्ये काम केलं आहे. सतीश कौशिक हे उत्कृष्ट अभिनेता आणि दिग्दर्शक असण्यासोबतच एक पटकथा लेखकदेखील होते.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version