‘रावण’ फेम अभिनेते नरेंद्र झा यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

‘रावण’ फेम अभिनेते नरेंद्र झा यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

सिनेमा आणि छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाची छाप पाडणारे अभिनेता नरेंद्र झा यांचे निधन झाल्याची धक्कदायक बातमी समोर आली आहे. बुधवारी सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाले. ते 55 वर्षांचे होते.

काही दिवसांपूर्वी नरेंद्र यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आला होता. त्यानंतर ते मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल होते. प्रकृतीत सुधारणा झाल्यामुळे आराम करण्यासाठी ते पालघरच्या वाडामध्ये असलेल्या फार्म हाऊसवर गेले होते. नरेंद्र यांना बुधवारी सकाळी 5 वाजताच्या सुमारास हृदयविकाराचा धक्का बसला. त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.  

नरेंद्र झा यांनी 1992 मध्ये एसआरसीसीमध्ये अभिनयाचा डिप्लोमा कोर्स केला होता. नेहरु विद्यापीठात त्यांनी इतिहास या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं होतं. मात्र अभिनयाच्या ओढीने दिल्ली सोडून ते मुंबईमध्ये आले. मुंबईत आल्यावर त्यांना मॉडेलिंगच्या अनेक ऑफर्स आल्या. 

शांती मालिकेतून नरेंद्र झा यांनी अभिनय क्षेत्रातील आपल्या कारकिर्दीला सुरूवात केली. क्योंकि सास भी कभी बहू थी, संविधान, बेगुसराय, चेहरा यासारख्या जवळपास 20 मालिकांत त्यांनी काम केले आहे. झी टीव्हीवरील ‘रावण’ मालिकेत त्यांनी मुख्य भूमिका साकारली होती.

रावणाच्या व्यक्तिरेखेमुळे त्यांची घराघरात ओळख निर्माण झाली. ‘घायल वन्स अगेन’ चित्रपटात त्यांनी साकारलेल्या खलनायकाची भूमिका खूप गाजली होती. फंटूश, हमारी अधुरी कहानी, काबिल, मोहंजोदारो, शोरगुल, फोर्स 2, हैदर, रईस यासारख्या सिनेमांत त्यांनी भूमिका पार पाडल्या होत्या.  याशिवाय अभिनेता प्रभाससोबत ते आगामी ‘साहो’ या सिनेमात काम करत होते. नरेंद्र यांनी हिंदीशिवाय तमिळ, तेलुगु भाषांमध्येही काम केलंय. 

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version