आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी, विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प आणि गेल्या १८ वर्षांपासून पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत असलेल्या धारावीला नवे रूप देण्यासाठी उद्योगपती गौतम अदानी सज्ज झाले आहेत. त्याच धारावी पुनर्विकास प्रकल्प साकारताना कोणत्याही अडचणी येऊ नयेत तसेच प्रस्तावित प्रकल्पाच्या अनुषंगाने आपल्या डोक्यात काय काय कल्पना आहेत, हे सांगण्यासाठी देशाचे आघाडीचे उद्योगपती गौतम अदानी यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. मंगळवारी सात वाजण्याच्या सुमारास ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी गौतम अदानी आणि राज ठाकरे या उभयतांमध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा झाली.
अदानी समूहाचे अध्यक्ष श्री. गौतम अदानी ह्यांनी राजसाहेबांची त्यांच्या ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. त्या भेटीची क्षणचित्रं. pic.twitter.com/x8xNNE91U7 — MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) January 10, 2023
महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेण्यापूर्वी उद्योगपती गौतम अदानी यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्धव बाळासहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेटी घेतली होती. त्यावेळी जवळपास एक तास दोघांमध्ये चर्चा सुरु होती. गौतम अदानी यांनी उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी ‘मातोश्री’वर जाऊन त्यांची भेट घेतली होती. याशिवाय, गौतम अदानी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही मुंबईतील शासकीय निवासस्थानी भेट घेतली होती. त्यावेळी अदानी आणि शिंदे यांच्यात जवळपास ४५ मिनिटे बैठक चालली होती.
दरम्यान, प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात मैत्रीचे संबंध आहेत, म्हणूनच गौतम अदानी यांचा व्यवसाय सुरळीत सुरू आहे, असा दावा केला जातो. मात्र, गौताम अदानी यांनी याबाबत महत्त्वाचं विधान केलं आहे. भाजपाचं राज्य नसलेल्या राज्यातही माझा व्यवसाय आहे, असं गौतम अदानी म्हणाले. प्रत्येक राज्यात जास्तीत जास्त गुंतवणूक करणे हे आमचं उद्दीष्ट्य आहे. आम्हाला या एका गोष्टीचा आनंद आहे की देशातील २२ राज्यांत अदानी समूह काम करत आहे आणि त्यातील काही राज्यात भाजपाचं सरकार नाही, असं गौतम अदानी म्हणाले. आप की अदालत या कार्यक्रमात ते बोलत होते.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.