वाशीममध्ये हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. वाशीम शहरातील सिव्हिल लाईन परिसरातील गव्हाणकर नगर येथे बीएससी नर्सिंगच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मूळची कारंजा तालुक्यातील मोहगव्हाण येथील राहणारी नेत्रा लाड ही विद्यार्थिनी वाशीम येथील शासकीय नर्सिंग महाविद्यालयात बीएससी नर्सिंगच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत होती.
शिक्षणासाठी ती वाशिम शहरातील गव्हाणकर नगर येथे भाड्याच्या खोलीत राहत होती. याच खोलीत तिने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. घटनेची माहिती मिळताच वाशीम शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
या घटनेमुळे शैक्षणिक वर्तुळात आणि परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. नुकताच बीएससी नर्सिंगचा निकाल लागला असून, या निकालात आलेल्या अपयशामुळे किंवा कमी गुणांमुळे नेत्रा गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावाखाली तिने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले असले तरी या घटनेनंतर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास सुरू केला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.