मुंबईच्या पायधुनी परिसरातून हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. पायधुनी परिसरात एका 7 वर्षांच्या निष्पाप अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. इमारतीच्या सुरक्षा रक्षकाने हे संतापजनक कृत्य केल्याचा संशय असून, यावरून परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडीत 7 वर्षीय अल्पवलीन मुलगी ही बिल्डींगमधल्या वॉशरूममध्ये गेली असताना वॉचमनने वॉशरूममध्ये शिरून हे राक्षसी कृत्य केलं आहे.
या घटनेत पीडित मुलगी गंभीर जखमी झाली असून पीडित चिमुरडीची प्रकृती पाहता, तिला घटनेनंतर तात्काळ वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच संतप्त नागरिकांनी पायधुनी पोलिस ठाण्याबाहेर एकच गर्दी केली आणि पोलिस ठाण्याला घेराव घातला. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी संतप्त जमावाकडून रस्त्यावर उतरून 'रस्तारोको' आंदोलन करण्यात आले आहे. आंदोलकांनी पोलिसांविरोधात आणि प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि घटनेची माहिती घेण्यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे पायधूनी पोलीस ठाण्यात पोहोचले होते. यावेळी सतंप्त नागरीकांनी आणि नातेवाईकांनी राहुल नार्वेकर यांना घेराव घातला होता. त्याचसोबत प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. जमावाचा वाढता रोष आणि कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती पाहता, पोलिस ठाणे आणि परिसरात अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
विरारमध्ये 10 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करुन धमकावल्याचा प्रकार
विरारमध्ये अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराची धक्कादायक घटना समोर आली असून या प्रकरणामुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे. विरारमध्ये 10 वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. घरात मुलगी एकटी असताना शेजारी राहणाऱ्या 32 वर्षीय इसमाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले आणि कोणालाही न सांगण्यासाठी तिला धमकावले. मुलीची आई अचानक घरी आल्यानंतर संपूर्ण प्रकार उघडकीस आला. यानंतर स्थानिक नागरिकांनी आरोपीला चांगलाच चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले.
विरार पोलिसांकडून आरोपीला अटक करण्यात आली असून आरोपीवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. अल्पवयीन मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून अशा गुन्ह्यांविरोधात कठोर आणि तातडीची कारवाई करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.