नवी दिल्ली – नवीन कृषी कायद्याच्या विरोधातील दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला सात महिने पूर्ण झाले आहेत . केंद्र सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आणि सरकारचा निषेध करण्यासाठी शनिवारी देशभरातून राजभवनावर शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्यात आला. संयुक्त शेतकरी मोर्चाने या निषेध मोर्चाला ‘शेती वाचवा, लोकशाही वाचवा’ असे नाव दिले आहे. शेतकरी मोर्चाच्या वतीने राष्ट्रपती आणि वेगवेगळ्या राज्यांतील राज्यपालांना मागण्यांचे निवेदन देण्यात येईल. दिल्लीमध्ये शेतकऱ्यांच्या निषेध मोर्चामुळे चार तासांसाठी मेट्रो रेल्वे बंद ठेवण्यात आली.
शेतकरी नेते युध्दवीर सिंग ८ ते १० शेतकऱ्यांसोबत दिल्लीतील उपराज्यपालांच्या घराजवळ पोहोचले असता पोलिसांनी त्यांना राजभवनात जाण्यापासून रोखले आणि ताब्यात घेतले. दिल्ली पोलिसांनी उपराज्यपालांच्या निवासस्थानाबाहेर तटबंदी केली आहे. जेणेकरून शेतकरी तिथे पोहोचू शकणार नाहीत. उपराज्यपालांच्या घराकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पोलीस आणि निमलष्करी दल तैनात करण्यात आले आहेत, याशिवाय काटेरी तारांनी कुंपण करण्यात आले, तसेच शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर थांबविण्यासाठी ट्रक आणि डंपर रस्त्यावर उभे केले आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.