500 Stray Dogs Killed : भटक्या कुत्र्यांपासून लोकांना होणारा त्रास सर्वपरिचित आहे. मात्र, हा त्रास कमी करण्यासाठी कायदेशीर मार्गाने विविध उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, यादरम्यानच माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. स्थानिक ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये दिलेले 'भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याचे' आश्वासन पूर्ण करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी चक्क 500 कुत्र्यांची विषप्रयोग करून हत्या केल्याचा आरोप आहे. गेल्या 7 दिवसांत झालेल्या या सामूहिक हत्येप्रकरणी पोलिसांनी पाच सरपंचांसह सहा जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले असून, या क्रूरतेमुळे प्राणीप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
विषाचे इंजेक्शन देऊन सामूहिक कत्तल
कामारेड्डी जिल्ह्यातील पालवंचा मंडळातील पाच गावांमध्ये गेल्या दोन-तीन दिवसांत सुमारे 200 कुत्र्यांना विषारी इंजेक्शन देऊन मारण्यात आले. प्राणी कल्याण कार्यकर्ते अदुलपुरम गौतम यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, भवानीपेठ, पालवंचा, फरीदपेठ, वाडी आणि बंदरमेश्वरपल्ली या गावांमध्ये ही क्रूरता पाहायला मिळाली. गावातील सरपंचांनी एका व्यक्तीला कुत्र्यांना मारण्यासाठी भाड्याने बोलावले होते. हनमकोंडा जिल्ह्यातील श्यामपेठ आणि अरेपल्ली गावांतही 6 ते 9 जानेवारी दरम्यान अशाच प्रकारे 300 कुत्र्यांची कत्तल करण्यात आली होती.
निवडणुकीतील 'अजब' आश्वासन आणि कारवाई
तेलंगणा राज्यातील कामारेड्डी आणि हनमकोंडा जिल्ह्यांमध्ये घडवण्यात आलेल्या या सामूहिक हत्यांमागील कारण अधिक धक्कादायक आहे. अलीकडेच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांदरम्यान काही उमेदवारांनी ग्रामस्थांना आश्वासन दिले होते की, निवडून आल्यास ते गावातील भटक्या कुत्र्यांचा आणि माकडांचा बंदोबस्त करतील. हे आश्वासन पूर्ण करण्यासाठी निवडून आलेल्या सरपंचांनी वैज्ञानिक आणि कायदेशीर पद्धतीने समस्या सोडवण्याऐवजी अमानुष कत्तलीचा मार्ग निवडला. या प्रकरणी पोलिसांनी पाच सरपंच आणि एका मारेकऱ्यावर 'पशु क्रूरता प्रतिबंधक कायदा 1960' आणि भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.
शवविच्छेदन आणि फॉरेन्सिक तपास सुरू
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मारलेल्या कुत्र्यांचे मृतदेह गावाबाहेर फेकून देण्यात आले होते. पशुवैद्यकीय पथकांनी हे मृतदेह बाहेर काढून त्यांचे शवविच्छेदन (Post-mortem) केले आहे. कुत्र्यांना नेमके कोणते विष टोचण्यात आले होते, हे शोधण्यासाठी शरीराचे नमुने (Viscera Samples) हैदराबाद येथील फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीकडे पाठवण्यात आले आहेत. या प्रकरणातील गांभीर्य लक्षात घेऊन आरोपींना नोटिसा बजावण्यात आल्या असून, पुढील तपास सुरू आहे.
सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी आणि लोकशाहीचा पेच
विशेष म्हणजे, ही घटना अशा वेळी घडली आहे जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावर राज्यांनी कडक पावले उचलावीत, असे आदेश दिले आहेत. कुत्र्यांनी चावा घेतल्यास राज्य सरकारला मोठी भरपाई द्यावी लागेल, असे न्यायालयाने म्हटले असतानाच, तेलंगणातील लोकप्रतिनिधींनी कायद्याचा भंग करत हा अघोरी मार्ग पत्करला आहे. प्राणी हक्क कार्यकर्त्यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला असून, दोषींना कडक शिक्षा करण्याची मागणी केली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.