जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
बेस्टला अनुदान पुरवल्या जाणाऱ्या केंद्र सरकारच्या ‘फेम इंडिया’ अंतर्गत 40 एसी इलेक्ट्रिक मिडी बसेस उपक्रमात सामाविष्ठ होणार असून त्यासाठी 60 टक्के अनुदान मिळणार आहे.
इलेक्ट्रिक बसेस चालवण्यातील तांत्रिक ज्ञानाचा अभाव, बॅटरी पुरवठ्याचा प्रश्न आदी मुद्द्यांच्या अनुषंगाने या सर्व बसेस कंत्राटी स्तरावर चालविण्याच्या प्रस्तावास मंगळवारी बेस्ट समिती बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.
बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात 40 इलेक्ट्रिक बसेस आणताना त्या उपक्रमाने स्वत: चालवणे आवश्यक आहे. या प्रस्तावानुसार या प्रत्येक बसमधील बॅटरीसाठी लागणारी किंमत एकूण बसच्या किंमतीत 60 टक्के इतकी आहे. या बॅटरी आयात केल्या जाणार आहेत. बॅटरी पुन्हा चार्ज करण्यासाठी यंत्रणा कशी, कुठे बसवणार असे प्रश्न भाजपचे सदस्य सुनील गणाचार्य यांनी उपस्थित केले. या बसच्या दिवसभरातून किती फेऱ्या होतील, याचाही अंदाज घेतल्या नसल्याचा आक्षेप त्यांनी नोंदवला. बस वाटेत बंद पडल्या तर पर्याय कोणते असा प्रश्न मुंबई पालिकेतील विरोधी पक्षनेते आणि समितीतील काँग्रेस सदस्य रवी राजा यांनी उपस्थित केला.
इलेक्ट्रिक बसची किंमत साधारण 1 कोटी 60 लाखांपर्यंत असून त्यातील 60 टक्के इतकी रक्कम अनुदानाच्या स्वरुपात बेस्ट उपक्रमास मिळणार आहे. अशा 40 बसेस बेस्टच्या ताफ्यात येणार असून या बसेस सात वर्षांच्या भाडेतत्त्वावर चालवण्यात येतील.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.