शिर्डी : शिर्डीतील साई मंदिराच्या चार नंबर प्रवेशद्वारासमोर भरगर्दीच्या ठिकाणी काकडी-कैरी विकणाऱ्या एका 30 वर्षीय महिलेवर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. या घटनेमुळे मंदिर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. जयश्री साईनाथ क्षीरसागर (वय 30) असे या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. हल्ल्यानंतर त्यांना तातडीने साई संस्थानच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे समजते. या प्रकरणी पोलिसांनी दोन महिलांना अटक केली असल्याचे सांगितले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री 9 वाजेच्या सुमारास साई मंदिराच्या चार नंबर प्रवेशद्वारासमोर स्टिकर आणि फळे विकणाऱ्या मुलींकडून जयश्री साईनाथ क्षीरसागर यांच्यावर चाकूने वार करण्यात आले. फळे विकण्यासाठी उभं राहण्याच्या कारणाहून हा वाद झाल्याचे समजते. महिला हत्येप्रकरणी शिर्डी पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकू हल्ल्याच्या घटनेनंतर काही वेळातच शिर्डी पोलिसांनी आरोपी महिलांना ताब्यात घेतले. अंजली खंडीझोड (वय 22), फिजा पटेल (वय 21, रा. कालिकानगर शिर्डी) या दोन महिलांना पोलिसांनी बेड्या घातल्या आहेत. शिर्डी पोलिसांकडून घटनेचा अधिक तपास सुरू आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.