मलकागिरी, १५ मार्च २०२४, प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील सर्वात मोठ्या मतदारसंघात शक्तीप्रदर्शन करत आहेत. ते तेलंगणमधील मलकागिरी लोकसभा मतदारसंघात आहेत. मलकागिरी लोकसभा मतदारसंघात सुमारे ३० लाख मतदार आहेत.
पंतप्रधान मोदींनी मागील काही आठवड्यात वेगवेगळ्या राज्यांचे दौरे करून आणि हजारो प्रकल्पांचे उद्घाटन करून लोकसभा निवडणुकीसाठी प्रचाराला सुरुवात केली आहे. आतापर्यंत देशातील बहुसंख्य राज्यांचे धावते दौरे करून पंतप्रधान मोदींनी प्रचाराचा धुरळा उडवून दिल्याचा दावा भाजपाकडून करण्यात आला आहे.
पंतप्रधान तेलंगणमध्ये, के. कविता ईडीच्या ताब्यात
पंतप्रधान नरेंद्र मोदी तेलंगणमध्ये पोहोचले असतानाच दिल्लीच्या दारू घोटाळ्यात ईडीने भारत राष्ट्र समितीची आमदार के. कविता हिला ताब्यात घेतले आहे. ईडीच्या हैदराबाद येथील पथकाने ही कारवाई केली आहे. के. कविता ही तेलंगणचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची मुलगी आहे. याआधी दिल्लीच्या दारू घोटाळ्यात सीबीआय आणि ईडीने के. कविता हिची चौकशी केली होती. आता ईडीने के. कविता हिला ताब्यात घेतले आहे.
काही दिवसांपूर्वी दिल्लीच्या दारू घोटाळ्यात ईडीने के. कविताची जवळपास नऊ तास चौकशी केली होती. दारू घोटाळ्यातून मोठी रक्कम घेतल्याच्या संशयावरून के. कविताची चौकशी करण्यात आली. तेलंगणमधील काही नेते आणि व्यावसायिक यांचीही चौकशी करण्यात आली. याच घोटाळ्यात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आठ वेळा समन्स बजावले आहे. पण अद्याप केजरीवाल ईडीसमोर चौकशीसाठी हजर झालेले नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हैदराबादच्या मलकागिरी दौऱ्यावर
आचारसंहितेपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी मलकागिरी मतदारसंघात रोड शो करणार आहेत. मलकागिरी देशातील सर्वात मोठा मतदारसंघ आहे. हा रोड शो मिरजलगुडा ते हैदराबादजवळील मलकाजगिरी चौरस्ता असा सुमारे ५ किलोमीटरचा आहे. रोड शोसाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. हैदराबादमधील राजभवनात रात्रभर मुक्काम केल्यानंतर, पंतप्रधान उद्या सकाळी नागरकुर्नूलला पोहोचतील आणि एससी लोकसभा मतदारसंघातील जाहीर सभेला संबोधित करतील.
गेल्या १० दिवसांत पंतप्रधानांची तेलंगणा राज्याची ही दुसरी भेट आहे. तेलंगणातील सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी पक्ष मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित करून, पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपाचे वरिष्ठ नेते वारंवार राज्याला भेट देत आहेत. मोदींनी या महिन्याच्या सुरुवातीला ४ आणि ५ तारखेला आदिलाबाद आणि संगा रेड्डी राज्यात भेट दिली आणि हजारो कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.