कल्याणसह परिसरातील पालिकांसाठी एकत्रित परिवहन सेवा

कल्याणसह परिसरातील पालिकांसाठी एकत्रित परिवहन सेवा

कल्याण, १४ मार्च २०२४, प्रतिनिधी : मुंबई महानगर क्षेत्रातील कल्याण-डोंबिवली, भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका, उल्हासनगर महानगरपालिका, अंबरनाथ नगरपरिषद व कुळगांव बदलापूर नगरपरिषद या क्षेत्रांची एकत्रित परिवहन सेवा स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे परिसरातील नागरिकांना रेल्वे व्यतिरिक्त आणखी एक सक्षम सार्वजनिक वाहतूक पर्याय उपलब्ध होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली.

मुंबई महानगर क्षेत्रातील कल्याण-डोंबिवली महानगरपालिका परिक्षेत्राजवळच्या भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका, उल्हासनगर महानगरपालिका, अंबरनाथ नगरपरिषद व कुळगांव बदलापूर नगरपरिषद या स्थानिक स्वराज्य संस्थांचे परिवहन सेवा उपक्रम पूर्ण क्षमतेने अस्तित्वात नाहीत. या क्षेत्रांमध्ये कल्याण-डोंबिवली महानगरपालिका परिवहन उपक्रमांमार्फत बससेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून सातत्याने केली जात होती. एकत्रित परिवहन सेवा क्षेत्र २२५ चौरस किलोमीटर इतके मोठे असेल. या परिसराची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार ३३ लाख ४३ हजारांपेक्षा जास्त आहे. मागील तेरा वर्षात या भागातील लोकसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामुळे स्थानिकांच्या सोयीसाठी एकत्रित परिवहन सेवा सुरू करण्याचा निर्णय झाल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

भविष्यात एकत्रित परिवहन सेवेमुळे प्रवाशांना सुलभ व सहज वाहतूक सेवा रास्तदरात उपलब्ध होणार आहे. तसेच परिसरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम होणार असून यामुळे वाहतूक कोंडीची समस्या कमी होण्यास मदत होणार आहे. प्रदूषण नियंत्रण आणि पर्यावरण संरक्षणावर शासनाचा भर आहे. या परिवहन सेवेत नवीन ईव्ही बसेस अंतर्भुत करण्यात येणार असल्याने शहरामधील हवा प्रदूषणाची पातळी नियंत्रित आणि कमी करणे शक्य होणार आहे. या परिवहन सेवेकरिता कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रामध्ये शहाड येथे एकत्रित परिवहन उपक्रमाच्या प्रशासकीय कार्यालयासाठी परिवहन भवन बांधण्यात येणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version