जालना, २१ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : मराठ्यांनो आरक्षणासाठी २४ फेब्रुवारीपासून संध्याकाळी चार ते सात या वेळेत दररोज रास्तारोको करा, असा आदेश मनोज जरांगे यांनी आंदोलकांना दिला आहे. बारावीची परीक्षा देत असलेल्यांना त्रास देऊ नका, असेही जरांगे मराठ्यांना म्हणाले. वृद्ध मराठ्यांनी आरक्षणासाठी बेमुदत उपोषणाला बसावे, मृत्यू झाला तर राज्य सरकार जबाबदार असेल; असे मनोज जरांगे म्हणाले. त्यांनी मराठ्यांना निवडणूक प्रचारासाठी येणाऱ्यांची वाहने जप्त करण्याचे आणि नेत्यांना आपल्या भागात प्रवेशबंदी करण्याचेही आदेश दिले आहेत.
आयोगाने आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत निवडणूक घेऊ नये, असे आवाहन मनोज जरांगे यांनी केले. मराठ्यांप्रमाणेच धनगर आणि मुसलमानांना आरक्षण मिळालेच पाहिजे… कसे मिळत नाही ते बघतोच… या शब्दात मनोज जरांगे यांनी राज्य शासनाला जाहीर इशारा दिला आहे.
याआधी जरांगेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य करून केले. शिंदेंची शिवरायांची शपथ अपूर्णच आहे… शिंदेंनी डोक्यातील हवा कमी करावी… मराठ्यांमुळे शिंदे पांढऱ्या कपड्यात फिरू शकतात… असे मनोज जरांगे म्हणाले. आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यातच सरकारला दणका बसेल. आता आंदोलनाची दिशा ठरली आहे, माघार घेणार नाही; असे मनोज जरांगे यांनी जाहीर केले. कुणबी आणि मराठा एकच, असा अध्यादेश काढा… कुणबी नोंदीच्या आधारावर त्यांच्या सगेसोयऱ्यांना दाखले द्या… दोन दिवसांत अंमलबजावणी सुरू करा… असे जरांगेंनी सरकारला सुनावले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.