मुंबई, ९ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : मुंबई महापालिकेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची स्थानिक गुंड मॉरिसने हत्या केली, यानंतर मॉरिसने आत्महत्या केली. या वैयक्तिक वैमनस्यातून झालेल्या घटनेचे निमित्त करून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका करायला सुरुवात केली आहे. राज्यातील कायदा – सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा एक जुना व्हिडीओ ट्वीट करण्यात आला आहे. ‘माझा मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र पोलिसांवर १०० टक्के विश्वास आहे. त्यांच्या हातात ४८ तास द्या, महाराष्ट्रातून गुन्हेगारी नाहीशी होईल…’ असे राज ठाकरे म्हणाले होते.
‘राज्यातील बेछूट गोळीबार, टोळीयुद्ध, गुन्हेगारांचा मुक्त संचार, कोयता गॅंगचा उच्छाद, मुलींचं अपहरण हे गुन्हे थांबवायचे असतील तर महाराष्ट्र पोलिसांना ४८ तासांची मोकळीक द्या…’ #बेधडक #राजदंड या शब्दात मनसे अधिकृत या ट्विटर हँडलवरून व्हिडीओ ट्वीट करण्यात आला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.