बारामती, ५ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : माझं पहिल्यापासून एवढंच म्हणणं होतं की, ज्येष्ठ नेत्यांनी शारीरिक दगदगीचा विचार करावा आणि प्रकृतीची काळजी घ्यावी. हे मत मी पूर्वी देखील मांडलेलं आहे. मात्र काही लोकं स्वतःच्या राजकारणासाठी ज्येष्ठ नेत्यांचा वापर करू पाहतात. त्यांना ह्या गोष्टी कळणार नाहीत. माझ्या त्यांच्याबद्दलच्या भावना मी वेळोवेळी मांडलेल्या आहेत. पण काही लोकांना ‘ध’ चा ‘मा’ करायची सवयच असते, अशा नाटकी लोकांना मी महत्त्व देत नाही. मात्र सर्वसामान्य लोकांना माझ्या भावना कळाव्यात, म्हणून मी हे म्हणणं मांडत आहे; असे अजित पवार यांनी ट्वीट केले आहे.
याआधी अजित पवार यांनी पुणे जिल्ह्यातील बारामती लोकसभा मतदारसंघातील एका सभेत बोलताना वयाचा मुद्दा उपस्थित केला होता. मतदारांनी भानिक मुद्यांपेक्षा विकासाला प्राधान्य द्यावे. मी दिलेला उमेदवार मोदींच्या मार्गदर्शनात विकासकामं करणार आहे. यामुळे त्या उमेदवाराला प्राधान्य दिल्यास फायदा होईल. काही जण वयाचा मुद्दा पुढे करत शेवटची निवडणूक असे म्हणत भावनिक आवाहन करतात. पण थांबताना दिसत नाहीत. त्यांची शेवटची निवडणूक कधी येणार ? असा प्रश्न उपस्थित करत अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे शरद पवारांवर टीका केली होती. पवारांच्या या भाषणावरून उलटसुलट प्रतिक्रिया येऊ लागल्यावर त्यांनी ट्वीट करून आपला वयाचा मुद्दा पुन्हा एकदा ठामपणे मांडला.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.