हेमंत सोरेन यांना अटक

हेमंत सोरेन यांना अटक

रांची, १ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीने झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना रांची येथून अटक केले. अटक टाळणे अशक्य आहे याची जाणीव झाल्यानंतर हेमंत सोरेन यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सादर केला. यानंतर झारखंड मुक्ती मोर्चाने पक्षाचे नेते म्हणून चंपई सोरेन यांची निवड केली. चंपई सोरेन लवकरच मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.

हेमंत सोरेन यांना ईडीने वारंवार समन्स पाठवून चौकशीसाठी बोलावले होते. पण हेमंत सोरेन चौकशी टाळत होते. काही तासांसाठी हेमंत सोरेन गायब झाले होते. ईडीने हेमंत सोरेन यांच्या दिल्लीतील घरातून रोख रक्कम आणि लक्झरी वाहनांची जप्ती केली. यानंतर हेमंत सोरेन रांची येथील घरी पोहोचले. पाठोपाठ ईडीचे पथक रांची येथील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचले. या बंगल्यावर हेमंत सोरेन यांची सात चौकशी झाली. या चौकशीनंतर हेमंत सोरेन यांनी बुधवारी रात्री राजीनामा सादर केला. ईडीने हेमंत सोरेन यांना राजीनामा दिल्यानंतर काही तासांनी अटक केले.

अटक होण्याआधी तयार केलेल्या एका व्हिडीओत हेमंत सोरेन यांनी त्यांच्यावर ईडीने केलेले आरोप फेटाळले. राजकीय हेतूने कारवाई सुरू असल्याचा आरोप हेमंत सोरेन यांनी केला. याआधी १९९७ मध्ये चारा घोटाळा प्रकरणी सीबीआयने लालू यादव यांना अटक केली होते. या अटकेच्या आधी लालू यादव यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. राष्ट्रीय जनता दलने लालू यांची पत्नी राबडी देवी यांची नेतेपदी निवड केली. नंतर राबडी देवी यांनी बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. सोरेन प्रकरणात हेमंत सोरेन यांच्या पत्नीला मुख्यमंत्री केले जाईल अशी चर्चा होती. पण पक्षात हेमंत सोरेन यांच्या पत्नीला मुख्यमंत्री करण्यावरून एकमत झाले नाही. अखेर पक्षाचे नेते म्हणून चंपई सोरेन यांची निवड करण्यात आली.

कोण आहेत चंपई सोरेन ?

चंपई सोरेन सरायकेला-खरसावां जिल्ह्यातील जिलिंगगोडा येथील रहिवासी आहेत. त्यांच्या वडिलांचे नाव सिमल सोरेन असे आहे. चंपई यांचे वडील शेती करत होते. सिमल सोरेन यांच्या चार मुलांपैकी सर्वात मोठा मुलगा म्हणजे चंपई. चंपई सोरेन यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण झाले आहे. त्यांचा विवाह स्थानिक प्रथेनुसार लहान वयातच मानको यांच्यासोबत झाला. चंपई – मानको या दांपत्याला चार मुलगे आणि तीन मुली अशी सात अपत्ये आहेत. स्वतंत्र झारखंडसाठी सुरू झालेल्या आंदोलनात शिबू सोरेन यांचे विश्वासू म्हणून चंपई कार्यरत होते. आंदोलन काळात त्यांना झारखंड टायगर अशी नवी ओळख मिळाली. आधी अपक्ष म्हणून सरायकेला येथून पोटनिवडणूक लढवणारे चंपई नंतर झारखंड मुक्ती मोर्चा पक्षात गेले. चंपई सोरेन अर्जुन मुंडा सरकारच्या काळात तसेच हेमंत सोरेन सरकारच्या काळात दोन वेळा असे एकूण तीन वेळा राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून कार्यरत होते. आता ते झारखंडचे मुख्यमंत्री म्हणून लवकरच शपथ घेणार आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version