छत्रपती संभाजीनगर, २८ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारला दिलेली मुदत संपल्यानंतर आता मनोज जरांगे यांच्या नेतृत्त्वाखाली मराठा आंदोलक मुंबईच्या दिशेने कूच करणार आहेत. मनोज जरांगे हे मुंबईत बेमुदत उपोषण करणार आहेत. त्यासाठी मनोज जरांगे यांच्यासह मराठा आंदोलक २० जानेवारीला सकाळी ९ वाजता मुंबईच्या दिशेने कूच करतील. त्यानंतर मराठा मोर्चा मार्ग आणि नियोजन कशाप्रकारे असेल, याची तपशीलवार माहिती मनोज जरांगे पाटील यांच्याकडून देण्यात आली आहे. ते गुरुवारी छत्रपती संभाजीनगर येथील पत्रकार परिषदेत बोलत होते.
अंतरवाली सराटी ते मुंबई हे अंतर मनोज जरांगे पायी पार करणार आहेत. अंतरवाली सराटी येथून निघाल्यानंतर मराठा मोर्चा हा प्रथम बीडमध्ये दाखल होईल. त्यानंतर हा मोर्चा जालना-शहागड,-गेवराई-अहमदनगर-शिरुर-शिक्रापूर, रांजणगाव-खराडी-शिवाजीनगर-पुणे-लोणावळा-पनवेल- वाशी-चेंबूर-शिवाजी पार्क असा प्रवास करत आझाद मैदानात दाखल होतील. अंतरवाली सराटीहून मुंबईकडे जाताना मराठा आंदोलकांची वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये विभागणी होईल. या तुकडीच्या प्रमुखांनी आपापल्या लोकांची काळजी घ्यावी. कोणत्याही तुकडीतील लोक उद्रेक किंवा जाळपोळ करणार नाहीत, याची जबाबदारी संबंधित तुकडी प्रमुखाची असेल, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.
अंतरवाली सराटीवरुन निघाल्यानंतर मुंबईला जाईपर्यंत रस्त्यामधील गावांकडून आपल्या खाण्यापिण्याची सर्व सोय होईल, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे आपल्यासोबत नेलेली खाण्यापिण्याची शिदोरी मुंबईतच उघडावी लागेल. तरीही मराठा आंदोलकांची संख्या मोठी असल्यास एखाद्या गावात खाण्यापिण्याची सोय होऊ न शकल्यास मोर्चेकऱ्यांनी तयारीत राहावे. आपल्यासोबतच्या वाहनात स्वयंपाकाची सामुग्री आणि गरजेच्या सर्व गोष्टी ठेवा. आपलं वाहन हेच आपलं घर करा. ऊन, पाऊस, थंडी यापासून रक्षण करण्यासाठी याच वाहनांचा वापर करा. अंतरवाली ते मुंबई या प्रवासात पाय दुखले किंवा आजारी पडलात तरी औषधाच्या गोळ्या सोबत ठेवा, आपल्याला न थांबता मुंबईला जायचे आहे. मुंबई गाठायची या एकाच ध्येयाने वाटचाल करा. मराठ्यांनो मुंबईत अशी धडक मारा की, कोणी अशी धडक मारली नसेल. मुंबईत गेल्यानंतर यश मिळाल्याशिवाय माघारी यायचे नाही. त्यामुळे शेतीची कामं उरकून मराठा बांधवांनी ताबडतोब मुंबईकडे जाण्यासाठी सज्ज व्हावे, असे जरांगे म्हणाले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.