नागपूर, १२ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : मुंबई महानगरपालिकेच्या मागील २५ वर्षांतील आर्थिक कारभाराचे लेखापरीक्षण अर्थात ऑडिट करून त्याबाबतची श्वेतपत्रिका पुढील अधिवेशनात मांडण्यात येईल, त्यासाठी त्रिसदस्यी समिती गठीत करण्यात येईल अशी माहिती नगरविकास मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत पुरवणी मागण्यांना उत्तर देताना दिली. नियोजन विभागाचे अपर प्रधान सचिव, नगरविकास -१ चे प्रधान सचिव आणि संचालक (वित्त – लेखापरीक्षण) यांची समिती ही चौकशी करेल, असेही त्यांनी सांगितले. सूरज परमार गुन्हा प्रकरणी तपास सुरू असून याप्रकरणी अतिजलद तपास करण्याच्या सूचना दिल्याचेही त्यांनी सांगितले.
विधानसभेने नगरविकास विभागाच्या ५०१५ कोटी ११ लाख ९० हजार रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर केल्या. महसूल विभागाच्या ६३१ कोटी ६७ लाख ३८ हजार रुपयांच्या, तर मदत व पुनर्वसन विभागाच्या ११२ कोटी ८४ लाख १ हजार रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर केल्या. वन विभागाच्या ४२ कोटी ६१ लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर केल्या. वैद्यकीय शिक्षण विभागाच्या ३०८० कोटी ७३ लाख रुपयांच्या तर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या ५४ लाख ९६ हजार रुपयांचे पुरवणी मागण्या मंजूर केल्या.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.