शेतकरी दिल्लीत धडकणार

शेतकरी दिल्लीत धडकणार

येवला, १० डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी घातली आहे. कांद्याचे देशांतर्गत बाजारातील दर नियंत्रणात राखण्यासाठी घेतलेल्या या निर्णयाला व्यापारी विरोध करत आहेत. सरकारी निर्णयाचा निषेध म्हणून व्यापाऱ्यांनी लिलाव प्रक्रिया बंद केली आहे. लिलावाद्वारे कांद्याची खरेदी होत नसल्यामुळे शेतकऱ्यांची पंचाईत झाली आहे. यावर उपाय म्हणून शेतकऱ्यांच्या संघटनांनी थेट दिल्लीत मोर्चा नेण्याचा निर्णय घेतला आहे. निर्यातीवरील बंदी मागे घ्यावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीने दिल्लीत मोर्चा नेला जाणार आहे. शेतकऱ्यांचे प्रतिनिधी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांची भेट घेऊन कांदाप्रश्नी चर्चा करणार आहेत. कांद्याचे बाजार समितीतले किमान मूल्य हे किमान ३ हजार रुपये किंवा त्यापेक्षा जास्त ठेवावे तसेच कांद्याच्या निर्यातीवरील बंदी मागे घ्यावी या मागण्या शेतकरी करणार आहेत.

फडणवीस – गोयल चर्चा

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी मुंबईत सह्याद्री अतिथीगृह येथे केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांची भेट घेऊन कांदाप्रश्नी चर्चा केली. चर्चेत शेतकरी हिताचे सकारात्मक निर्णय घेतले जातील असे आश्वासन गोयल यांनी फडणवीस यांना दिले.

‘कांदा निर्यात बंदी उठवावी’

कांदा निर्यातीवर बंदी घातल्याने शेतकऱ्यांना मोठं नुकसान होत आहे, निर्यात बंदी उठवावी अशी आम्ही मागणी केली आहे; असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी म्हणाले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version