‘आम्ही या पराभवाचे आत्मचिंतन करू, मात्र तुम्हाला देखील आत्मचिंतन करावे लागणार आहे’अशी प्रतिक्रिया कसबा पेठ मतदारसंघाच्या निकालानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. दुसरीकडे भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांनी सुद्धा पराभवानंतर आपली प्रतिक्रिया दिली. उमेदवार म्हणून मी कमी पडलो. यामागची कारणे शोधणार आहे. पक्षाने मला संधी दिली, पण मीच कुठेतरी कमी पडलो. हा पराभव मला मान्य आहे, असे रासने यांनी सांगितले.
कसब्यामध्ये मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर तिथे पोटनिवडणुका लागल्या. या निवडणुकीत मुक्ता टिळक यांच्या कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी द्यावी, अशी मागणी केली जात होती. खुद्द टिळक कुटुंबातूनही तशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. मात्र, त्याऐवजी भाजपाकडून माजी आमदार हेमंत रासने यांना उमेदवारी दिल्यामुळे कसब्यात भाजपाविरोधी नाराजी असल्याचे सांगितले जात होते. अखेर आज मतमोजणीनंतर ही नाराजी निकालाच्या रुपाने दिसून आल्याचे सांगितले जात आहे.
कसबा पेठ मतदार संघात भाजपकडून हेमंत रासने यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काँग्रेसकडून रविंद्र धंगेकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. कसब्यात रासने आणि धंगेकर याच्यात चुरशीची लढत झाली… भाजप उमेदवार हेमंत रासने यांचा धक्कादायक रित्या पराभव झाला आहे. ‘काटे की टक्कर’ अशी ही लढत पाहिला मिळाली होती. मात्र काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांनी ११०४० मतांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव केला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.