भिवंडी, ५ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : कापड उद्योगाचे केंद्रबिंदू म्हणून भिवंडी शहर सर्वत्र परिचित आहे. कापड उद्योग मोठ्या संख्येने असल्याने या ठिकाणी कापडावर प्रक्रिया करणाऱ्या डाईंग आणि सायजिंग कंपन्यादेखील मोठ्या प्रमाणात थाटण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे सध्या या डाईंग सायजिंग कंपन्यांच्या बॉयलारमध्ये प्लास्टिक कचरा जाळला जात असल्याने मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण होत असून यामुळे शहरातील नागरिकांचा श्वास गुदमरत आहे. विशेष म्हणजे वारंवार तक्रारी करूनदेखील या कंपन्यांवर नियंत्रण असणाऱ्या प्रदूषण नियंत्रण मंडळाचे या गंभीर समस्येकडे पुरता दुर्लक्ष होत असल्याने येथील नागरिकांना आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. काय इथल्या नागरिकांच्या समस्या आहेत आणि शासनाकडून काही उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत की नाही याबाबत ग्राउंड रिपोर्ट…
सतत वातावरणात होणारा बदल तर शहरात आणि शहरालगत असलेल्या डाइंग आणि सायजिंगमुळे भिवंडीतील प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. त्याच बरोबर डम्पिंगच्या धुराबरोबर दूषित हवेचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्नाकडे भिवंडी शहर महानगरपालिका प्रदुषण नियंत्रण मंडळ पर्यावरण विभागाचे दुर्लक्ष झाले आहे.
डाईंग आणि सायजिंगच्या चिमण्यांच्या धुरामुळे परिसरात आणि नागरिकांना घराच्या छतावर धुराचे थर साचलेले आहेत. नागरिकांना त्या धुरामुळे श्वास घेताना त्रास होत असुन टि. बी. कर्करोगांसारखे मोठे आजार होण्याची दाट शक्यता आहे. लहाण मुलांमध्ये खोकला आणि घशाच्या समस्यात वाढ होत आहे. अशा शेकडो तक्रारी भिवंडी महानगरपालिकेकडे देऊन सुद्धा महापालिकेचे पर्यावरण विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे.
सुमारे सात लाख यंत्रमाग असलेल्या भिवंडी शहरात तब्बल ८० हुन अधिक सायझिंग कंपन्या आहेत. ज्यात ८० हुन अधिक बॉयलर असून ते २४ तास जळत असतात . या बॉयलर मध्ये दगडी कोळसा आणि लाकूड जळण्याचे आदेश नसताना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या हेतुपुरस्कर दुर्लक्षामुळे अनेक सायझिंग बॉयलर मध्ये प्लास्टिक कचरा ,कपड्याच्या चिंध्या जाळण्यासाठी वापरत असल्याचे समोर येत आहे. या प्लास्टिकमुळे निर्माण होणारा धूर हा मानवास घातक ठरत असल्याने त्यामुळे श्वसनाचे, डोळ्यांचे विकार नागरीकांना जडत आहेत.
भिवंडी शहरातील अनेक नागरी वस्तीत या सायझिंग असल्याने त्याचा मोठा त्रास या परिसरात राहणाऱ्या नागरीकांना होत असून याकडे प्रदूषण नियंत्रण मंडळ व पालिका प्रशासन या दोघांचेही सोयीस्कर दुर्लक्ष होत आहे. वास्तविक या बॉयलर मध्ये जाळण्यासाठी वापरण्यात येणारा दगडी कोळसा १० रुपये किलो तर लाकूड ५ रुपये किलो ने मिळत असल्याची माहिती असून त्यापेक्षा प्लास्टिक अवघ्या २ रुपये किलो दराने मिळत असल्याने स्वस्त इंधनाच्या लालसेपोटी सायझिंग चालक या घातक प्लास्टिक आणि चिंध्यांचा वापर बॉयलरमध्ये करीत आहेत. हा प्लास्टिक जाळल्याने त्या पासून निघणारा रासायनिक घटक असलेला धूर हा नागरीकांसह शहरातील पर्यावरणास मारक ठरत आहे.
भिवंडी शहर हे एमएमआर क्षेत्रामध्ये असल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळास आदेश दिलेले आहेत की भिवंडी शहर एम एम आर विभागाचा आणि परिसराचा प्रदुषण सर्वेक्षण अहवाल न्यायालयात सादर करायचे आहेत. मागील महिन्यात हा आदेश आला असून भिवंडीत प्रदूषण ऑडिटसाठी कुठलीही यंत्रणा भिवंडीत नाही तर महानगरपालिकेमध्ये प्रदूषण विभाग आहेत. परंतु त्यामध्ये कुठलेही प्रदूषण मोजमाप करणारे साधने नसल्याने ते महाराष्ट्र प्रदूषण मंडळ कल्याण विभाग यांच्या वरती अवलंबून आहेत तर कल्याण विभाग देखील भिवंडीतील सायझिंग डायनिंग प्रदूषणाचे ऑडिट करत नसल्याने स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी दिसत आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळ व मनपा पर्यावर विभागा यांच्या आशीर्वादाने सायझिंग डाईंग चालू आहेत असा आरोप स्थानिक नागरिक करत आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.