सांगली, ३१ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक शिवसेना आमदार अनिल बाबर यांचे निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. अनिल बाबर यांनी सांगलीतील खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केले. सरपंच ते आमदार असा राजकीय प्रवास त्यांनी केला. अनिल बाबर यांनी दु्ष्काळी भागातील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी संघर्ष केला. श्वास घेण्यास त्रास होत असल्याची तक्रार केल्यानंतर अविल बाबर यांना सांगलीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथेच बुधवार ३१ जानेवारी रोजी पहाटे त्यांचे निधन झाले. अनिल बाबर यांनी जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून १९७२ मध्ये काम केलं. गार्डी गावाचे सरपंच… पंचायत समितीचे सभापती… १९९० मध्ये पहिल्यांदा आमदार… यशवंत सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष… असा प्रवास त्यांनी केला. अनिल बाबर १९९०, १९९९, २०१४, २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीत विजयी झाले. त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना असा राजकीय प्रवास केला.
समाजकार्याचा वारसा चालवणारा सच्चा लोकप्रतिनिधी गमावला
आमदार अनिल बाबर यांच्या निधनाने आपण खऱ्या अर्थाने शिवसेनेचा समाजकार्याचा वसा चालवणारा एक अतिशय प्रभावी असा लोकप्रतिनिधी गमावला आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत. अनिल बाबर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.
खानापूर आटपाडी मतदारसंघामध्ये अनिल बाबर यांनी केलेले कार्य शिवसेना कधीही विसरू शकत नाही. सांगली जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागामध्ये पाणी आणण्यासाठी सिंचनासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. कृष्णा खोऱ्यातील पाणी आणि टेंभू योजना कार्यान्वित व्हावी म्हणून ते सतत झगडत होते. बेघरांना घरे मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे, रक्तदान शिबिरांचे आयोजन करणे किंवा शिक्षण संस्थांच्या माध्यमातून शिक्षणाचा तळागाळापर्यंत केलेला प्रसार असो, अनिल बाबर यांनी एक आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून काम केले. खानापूर आटपाडी भागामध्ये शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी अनिल बाबर हे कायम एका लढाऊ वृत्तीने लढले. त्यांनी या भागातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी अथक प्रयत्न केले. त्यांच्या निधनाने शिवसेनेचा एक ज्येष्ठ लोकप्रतिनिधी, माझा जवळचा सहकारी आणि मार्गदर्शक आम्ही गमावला आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले.
उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा शोकसंदेश
विधानसभा सदस्य अनिल बाबर यांच्या अकस्मात निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. त्यांच्या निधनाने एक संवेदनशील लोकप्रतिनिधी आपण गमावला आहे. वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी ते सरपंच म्हणून निवडून आले. त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य ते चार वेळा विधानसभा सदस्य अशी प्रदीर्घ त्यांची राजकीय कारकिर्द राहिली. मतदारसंघातील प्रश्न घेऊन ते सातत्याने भेटत असत. त्यांचे असे अकस्मात आपल्यातून निघून जाणे, मनाला अत्यंत वेदनादायी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत; या शब्दात उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी शोकसंदेश दिला.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.