नवी दिल्ली, २३ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : कर्तव्य पथावर प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या पथसंचलनासाठी महाराष्ट्राच्या वतीने ‘भारतीय लोकशाहीचे प्रेरणास्थान : छत्रपती शिवाजी महाराज’ या संकल्पनेवर आधारित चित्ररथ सादर होणार आहे. यंदा भारताचा ७५ वा प्रजासत्ताक दिन साजरा होणार आहे. या अमृत महोत्सवी सोहळ्यात महाराष्ट्राचा चित्ररथ सहभागी होणार आहे. यंदा २६ जानेवारी रोजी कर्तव्य पथावर ३० चित्ररथ सादर होणार आहेत. यात महाराष्ट्राच्या चित्ररथाचाही समावेश आहे. एकूण १६ राज्य, सात केंद्रशासित प्रदेश आणि विविध केंद्रीय मंत्रालये यांचे चित्ररथ संचलनात सहभागी होणार आहेत.
महाराष्ट्राचा चित्ररथ
महाराष्ट्राच्या चित्ररथात छत्रपती शिवाजी महाराजांची जीवनकथा त्यांच्या बालपणापासून ते राज्याभिषेक दिवसापर्यंत दाखवण्यात आली आहे. चित्ररथाच्या दर्शनीय भागात दोन महिला योद्धा दांडपट्टा फिरवतांना दिसतात व राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराजांना राजकारण, समानता, न्याय आणि समता यांचे धडे देताना दिसत आहेत. त्यांच्या मागे न्यायाचे प्रतीक असलेले तराजू दाखवण्यात आले आहे. महाराजांची आज्ञापत्रे आणि काही राजेशाही चिन्हे देखील चित्ररथावर दाखवण्यात आली आहेत. मध्यभागी अष्टप्रधान मंडळ दरबार दाखवण्यात आला आहे. या दरबारात काही महिला आपल्या प्रश्नांसाठी उपस्थित असल्याचे दिसत आहेत. तर मागील भागात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, राजमाता जिजाऊ आणि इतर दरबारी यांच्या दृश्यांसह छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दाखवण्यात आला आहे. तर शेवटच्या भागात किल्ला आणि राजमुद्रांची प्रतिकृती दाखवण्यात आली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.