अयोध्या, १७ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : अयोध्येत प्रभू रामाच्या प्राणप्रतिष्ठेला सुरुवात झाली. प्राणप्रतिष्ठेसाठी १६ जानेवारीपासून धार्मिक विधी सुरू झाले आहेत. बुधवारी प्रभू रामाच्या मूर्तीचा मंदिराच्या आवारात प्रवेश झाला आहे. गाभाऱ्यातील प्राणप्रतिष्ठेसाठी मुख्य पूजा २२ जानेवारी रोजी पंतप्रधान मोदी करणार आहेत. जाणून घेऊ प्राणप्रतिष्ठेसाठी १६ ते २२ जानेवारी दरम्यान दररोज होणार असलेले धार्मिक विधी आणि त्यांचे महत्त्व…
मंगळवार १६ जानेवारी २०२४ : प्रायश्चित्त आणि कर्मकुटी
पूजा करणार असलेल्या यजमानाकडून कळत नकळत झालेल्या चुकांसाठी त्याला प्रायश्चित्त घ्यावे लागते. यासाठी प्रायश्चित्त पूजा करतात. या पूजेद्वारे यजमानाच्या अंतःकरणाची शुद्धी केली जाते. तर कर्मकुटी पूजा म्हणजे यज्ञशाळेची पूजा. कर्मकुटीत औषधी ठेचून पाण्यात मिसळून यजमान व प्रभू दोघांनाही स्नान घालतात. यज्ञशाळा सुरू करण्याआधी हवनकुंड आणि वेदीची पूजा केली जाते. नंतर विष्णूच्या मूर्तीची पूजा केली जाते. ही पूजा केल्यानंतरच मंदिरात प्रवेश करतात आणि मंदिराच्या प्रत्येक भागाची पूजा करतात.
बुधवार १७ जानेवारी २०२४ : मूर्तीचा मंदिराच्या आवारात प्रवेश
प्रभू रामाची मूर्ती १७ जानेवारी रोजी मंदिर संकुलात प्रवेश करेल
गुरुवार १८ जानेवारी २०२४ : तीर्थपूजा, जलयात्रा, जलाधिवास, गंधाधिवास
प्रभू रामाची तीर्थपूजा आणि जलयात्रा होईल. यानंतर प्रभू रामाच्या मूर्तीला पाण्याने स्नान घातले जाईल. संध्याकाळी प्रभू रामाच्या मूर्तीला अत्तर लावले जाईल.
शुक्रवार १९ जानेवारी २०२४ : औषधीवास, केसराधिवास, घृताधिवास, धनाधिवास
प्रभू रामाच्या मूर्तीला आधी औषधीवासात नंतर केशरामध्ये यानंतर तुपामध्ये ठेवले जाईल. संध्याकाळी प्रभू रामाच्या मूर्तीला तांदुळामध्ये ठेवले जाईल.
शनिवार २० जानेवारी २०२४ : शर्कराधिवास, फलाधिवास, पुष्पाधिवास
प्रभू रामाच्या मूर्तीला आधी साखरेत नंतर फळांमध्ये यानंतर फुलांमध्ये ठेवले जाईल.
रविवार २१ जानेवारी २०२४ : मधाधिवास, शय्याधिवास
प्रभू रामाच्या मूर्तीला मधात ठेवले जाईल. संध्याकाळी प्रभू रामाच्या मूर्तीला शय्येवर ठेवले जाईल. रामाच्या मूर्तीला विश्रांती देण्याचा विधी पूर्ण झाल्यानंतर सोमवारी मुख्य पूजेला सुरुवात होईल.
सोमवार २२ जानेवारी २०२४ : प्राणप्रतिष्ठा (मुख्य पूजा)
अभिजीत मुहूर्त साधला जाईल. नियोजनानुसार दुपारी प्रभू रामाच्या मूर्तीची गाभाऱ्यात विधीवत प्राणप्रतिष्ठा केली जाईल. गाभाऱ्यात पंतप्रधान मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि प्रमुख पुजारी उपस्थित असतील.
सोहळ्याला मान्यवरांची उपस्थिती
प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला मान्यवरांची उपस्थिती असेल. यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदी पटेल, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित असतील. प्राणप्रतिष्ठेसाठी धार्मिक विधी १२१ आचार्यांचा समूह करणार आहे. श्री गणेशवर शास्त्री द्रविड सर्व धार्मिक विधींमध्ये समन्वय राखण्याची जबाबदारी सांभाळतील. काशीचे लक्ष्मीकांत दीक्षित मुख्य आचार्य म्हणून जबाबदारी सांभाळतील.
सोहळ्याला दीडशेपेक्षा जास्त परंपरांचे संत, देशातील प्रमुख धार्मिक विधी शाळांचे आचार्य, पन्नासपेक्षा जास्त आदिवासींचे प्रतिनिधी, गिरीवासींचे प्रतिनिधी, तत्ववासींचे प्रतिनिधी, द्विपवासी आदिवासींचे प्रतिनिधी तसेच महामंडलेश्वर, मंडलेश्वर, श्रीमहंत, महंत, नागा साधूंचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
शैव, वैष्णव, शाक्त, गाणपत्य, पात्य, शीख, बौद्ध, जैन, दशनाम शंकर, रामानंद, रामानुज, निम्बार्क, माध्व, विष्णु नामी, रामस्नेही, घिसापंथ, गरीबदासी, गौड़ीय, कबीरपंथी, वाल्मीकि, शंकरदेव (आसाम), माधव देव, इस्कॉन, रामकृष्ण मिशन, चिन्मय मिशन, भारत सेवाश्रम संघ, गायत्री परिवार, अनुकूल चंद्र ठाकुर परंपरा, ओडिशा के महिमा समाज, अकाली, निरंकारी, नामधारी (पंजाब), राधास्वामी, स्वामीनारायण, वारकरी, वीर शैव आदी विविध परंपरांचे प्रतिनिधी सोहळ्यात सहभागी होणार आहेत. प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर मान्यवरांना प्रभू रामाचे दर्शन घेता येईल. यानंतर २३ जानेवारीपासून सर्वांना दर्शन घेता येईल.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.