ज्येष्ठ शास्त्रीय गायिका डॉ. प्रभा अत्रे यांचे पुण्यात निधन

ज्येष्ठ शास्त्रीय गायिका डॉ. प्रभा अत्रे यांचे पुण्यात निधन

पुणे, १३ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : ज्येष्ठ शास्त्रीय गायिका स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांचे निधन झाले. त्या ९२ वर्षांच्या होत्या. प्रभा अत्रे यांना शनिवारी पहाटे झोपेतच ह्रदयविकाराचा झटका आला. त्यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी करून त्यांचे निधन झाल्याचे सांगितले. प्रभा अत्रे यांच्यावर सोमवारी अंत्यसंस्कार केले जातील. दोनच वर्षांपूर्वी कला क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी डॉ. प्रभा अत्रे यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

डॉ. प्रभा अत्रे या किराणा घराण्याच्या गायिका होत्या. त्या पं. सुरेशबाबू माने आणि हिराबाई बडोदेकर यांच्या शिष्या होत्या. केंद्र सरकारने त्यांना संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल १९९० मध्ये पद्मश्री, २००२ मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले. २०२२ मध्ये पद्मविभूषण देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. अत्रे यांना संगीत नाटक अकादमी तसेच पुण्यभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यांची संगीतावरील अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत. भारतीय शास्त्रीय संगीत जागतिक स्तरावर लोकप्रिय करण्यात प्रभा अत्रे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. प्रभा अत्रे यांचे संगीताच्या विविध शैलींवर प्रभुत्व होते. ख्याल, ठुमरी, दादरा, गझल यासारख्या विविध गायन प्रकारांत त्यांचे नैपुण्य होते.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version