पुणे, ५ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : पुण्यातील कोथरूड परिसरात ‘मुळशी पॅटर्न’ हिंसाचार झाला. गोळीबार झाला. गुंड शरद मोहोळला तीन गोळ्या लागल्या. गंभीर जखमी झालेल्या शरद मोहोळला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवार ५ जानेवारी २०२४ रोजी सकाळी घडली. या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.
कोण आहे शरद मोहोळ ?
शरद मोहोळ मुळशी तालुक्यातील एका गावातील होता. अतिशय सामान्य परिस्थितीत तो वाढला. त्याचे आई – वडील शेतकरी होते. गुंड संदीप मोहोळचा वाहन चालक म्हणून शरद मोहोळ आधी काम करत होता. पुण्यात संदीप मोहोळची हत्या झाली, त्यानंतर शरद मोहोळ याचा गुन्हेगारी विश्वात प्रवेश झाला. या घटनेला १५ – १६ वर्ष झाली. मागील काही वर्षात शरद मोहोळ हा पुण्यात सर्वाधिक सक्रीय झालेला गुंड म्हणून ओळखला जात होता. त्याच्यावर हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, अपहरण असे अनेक गंभीर गुन्हे होते. पिंटू मारणे हत्येप्रकरणी तसेच दासवे गावचे सरपंच शंकर धिंडले यांच्या हत्येप्रकरणी तो जामिनावर होता. त्यानेच दहशतवादी सिद्दीकीला ठार केले होते. पोलिसांनी जुलै २०२२ मध्ये त्याला पुणे जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी तडीपार केले होते.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.