नागपूर, २० डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : विरोधक नागपूरला जाणीवपूर्वक बदनाम करत आहेत. एनसीआरबीच्या अहवालात दोन बाबी असतात. एकूण गुन्हेगारी आणि प्रती लाख लोकसंख्येमागे घडलेले गुन्हे अशी वर्गवारी असते. नागपूरमध्ये २०२० च्या तुलनेत आत गुन्हेगारी कमी झाली आहे. २०२१ मध्ये नागपुरात २२३०२ गुन्हे घडले ते आता १९३६७ झाले आहेत. दिल्ली आणि मुंबईची तुलना केली तर मुंबईत रात्री १२ वाजता मुलगी फिरू शकते, त्यामुळे सुरक्षेची हमी इथे जास्त आहे, असे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. राज्यात दरवर्षी चार हजार मुली आणि ६४ हजार महिला बेपत्ता होतात. इतर राज्यांच्या तुलनेत आपल्या राज्याची स्थिती बरी आहे. एनसीआरबीच्या अहवाल तयार करताना २०११ ची लोकसंख्या गृहित धरली जाते. नवीन जनगणना होत नाही तोपर्यंत जुनीच लोकसंख्या गृहीत धरली जाते, असे फडणवीस यांनी सांगितले.
पोलीस दलात २३ हजार मनुष्यबळाची भरती करण्यात आली. यांच्या प्रशिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात व्यवस्था केली आहे. १९७६ नंतर या सरकारने पोलिसांचा पहिल्यांदा आकृतीबंध तयार केला. आता २०२३ च्या आकृतीबंधावर काम होणार आहे. पोलिस ठाण्यातील अंतराचा आणि सायबर गुन्ह्यांचा नियोजन करताना विचार होईल, असे फडणवीस म्हणाले.
गुन्हेगारीच्या बाबतीत ओरिसा, राजस्थान, केरळ, कर्नाटक, उत्तराखंड, आंध्रप्रदेश यानंतर महाराष्ट्र असा क्रम लागतो. अपहरणांच्या गुन्ह्यात महाराष्ट्र नवव्या स्थानी आहे. महिलांविरोधातील गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र बाराव्या स्थानी आहे. आर्थिक गुन्ह्यात महाराष्ट्र तेराव्या स्थानी आहे. महाराष्ट्रात २०२३ मध्ये ८२१८ दंगलीचे गुन्हे घडले; अशी माहिती फडणवीस यांनी दिली.
राज्यात महिलांची प्रकरणे हाताळण्यासाठी ८६ जलदगती न्यायालय तयार केल्याचे फडणवीस म्हणाले. राज्यात ड्रग्ज प्रकरणी २४ हजारपेक्षा जास्त आरोपींवर कारवाई झाली आहे. गेल्यावर्षी हाच आकडा १३ हजारांच्या घरात होता, असे फडणवीस म्हणाले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.