निरुपणकार सातारकर महाराजांचे निधन, मान्यवरांच्या प्रतिक्रिया

निरुपणकार सातारकर महाराजांचे निधन, मान्यवरांच्या प्रतिक्रिया

मुंबई, २६ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी :

‘ज्येष्ठ निरुपणकार हरपले’

ओघवती, रसाळ वाणी आणि मार्मिक शैलीने घराघरात कीर्तनाची गोडी वाढविणारे, भागवत धर्माचे वैश्विक राजदूत, वारकरी संप्रदायाचे बाबामहाराज सातारकर यांचे निधन महाराष्ट्राच्या भागवत आणि भक्ती संप्रदायासाठी मोठी हानी आहे. अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

शोकसंदेशात मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे की, सातारकर यांची रसाळ वाणी, निरूपणाची आगळी शैली कर्णमधुर होती. त्यांनी कीर्तन- निरूपण आणि भजन सातासमुद्रापार पोहचवले. सातारकर यांचे हे योगदान सदैव स्मरणात राहील. त्यांच्या निधनामुळे या संप्रदायातील अधिकारवाणीने मार्गदर्शन करणारा आधारवड अशा स्वरूपाचा विठ्ठल भक्त चिरशांत झाला आहे, असे नमूद करून मुख्यमंत्र्यांनी सातारकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

वारकरी संप्रदायाची मोठी हानी

ज्येष्ठ कीर्तनकार ह. भ. प. बाबामहाराज सातारकर यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. त्यांचे निधन ही वारकरी संप्रदायाची फार मोठी हानी आहे. वारकरी विचार आणि भागवत धर्म सर्वदूर नेण्यात एक कीर्तनकार म्हणून त्यांनी मोठे योगदान दिले. आवाजातील प्रेमळ आणि आश्वासक भाव तसेच उत्कृष्ट वकृत्व यामुळे त्यांच्या कीर्तन-प्रवचनांमध्ये श्रोते मंत्रगुग्ध होऊन जात. त्यातून मोठा चाहता वर्ग त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशभर निर्माण केला. राज्य सरकारने नुकताच ‘ज्ञानोबा-तुकाराम’ पुरस्कार त्यांना दिला होता. एक ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व, संत अभ्यासक आपल्यातून निघून गेले आहेत. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या आणि लाखो भाविकांच्या दुःखात मी सहभागी आहे; असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून श्रध्दांजली

“ज्येष्ठ किर्तनकार बाबा महाराज सातारकर यांनी महाराष्ट्राची विठ्ठल, ज्ञानेश्वर भक्तीची परंपरा, वारकरी सांप्रदायाचा वारसा समर्थपणे पुढे नेला. साध्या, सोप्या, रसाळ, ओघवत्या वाणीतल्या किर्तनांनी महाराष्ट्राचं प्रबोधन केलं. प्रबोधनाच्या चळवळीतून अज्ञान, अनीती, अंधश्रद्धेसारख्या कुप्रथांविरुद्ध लढा दिला. त्यांच्या किर्तनांनी व्यसनमुक्तीच्या लढ्याला बळ दिलं. महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक क्षेत्रात बाबा महाराजांचं स्वतंत्र स्थान होतं. त्यांचं निधन ही महाराष्ट्राच्या आध्यात्मिक, प्रबोधनाच्या चळवळीची मोठी हानी आहे. बाबा महाराजांच्या कुटुंबियांच्या, अनुयायांच्या दु:खात आम्ही सर्व सहभागी आहोत. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांना श्रध्दांजली वाहिली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version